राणे बिनशर्त जाहीर माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा,expressed forgiveness, otherwise action - Gujarati Samaj

`राणे बिनशर्त जाहीर माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा`

`राणे बिनशर्त जाहीर माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि गुजरात समाजातला तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नितेश राणेंनी मुंबईतील गुजराती समाजाबद्दल केलेल्या विधानांसंदर्भात बिनशर्त जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा गुजराती समाजानं दिलाय.

गुजराती समाज नरेंद्र मोदींची उघडपणे स्तुती करत आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आता थेट स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंना आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या गुजराती समाजाबद्दल राणेंनी केलेली विधानं गुजराती भाषिकांना खटकलीत. याप्रकरणी राज्य सरकार दरबारी न्याय मिळत नसल्यानं, अखेर नितेश राणेंवर कारवाईसाठी गुजराती समाजानं गुजरात विकास मंचच्या माध्यमातून कार्यवाही सुरु केली आहे.

गुजरात विकास मंचनं जुहू पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवर सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास तसंच राणेंनी गुजराती समाजाची बिनशर्त जाहीर माफी न मागितल्यास न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पदाधिका-यांनी घेतला आहे. याची माहिती, गुजरात विकास मंच पदाधिकारी जास्मीन शहा यांनी दिली.

गुजराती समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता थेट विधानभवनात आवाज उठवण्याचीही तयारी सुरु केली आहे. गुजरात विकास मंचनं विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. तसे जास्मीन शहा यांनी स्पष्ट केलं.

गुजराती भाषिक तसंच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र नितेश राणे यांनी गुजराती आणि मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी त्यावर कुठलंही भाष्य केलं नव्हतं. याबद्दल गुजराती समाजामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 7, 2013, 10:03


comments powered by Disqus