Last Updated: Friday, November 9, 2012, 07:13
www.24taas.com, मुंबईजादा 3 सिलिंडरला सबसिडी देण्याच्या निर्णयात मध्यमवर्गीयांवर अन्याय झाला असला, तरी आता या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत श्रेय घेण्याची लढा सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
सहा सिलिंडरव्यतिरिक्त 3 जादा सिलिंडरना सबसिडी देण्याचे आदेश काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांना दिले खरे.. मात्र सरसकट सबसिडी देणं परवडणार नसल्याचं सांगत काँग्रेसनं राज्यात हा निर्णय लागू करण्यास टाळाटाळ सुरु केली.. केंद्रात आणि राज्यात काँग्रेससोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं याविरोधात आंदोलनाचा इशारा देत, बुधवारच्या कॅबिनेट बैठकीचा अल्टिमेटमच मुख्यमंत्र्यांना दिला.. यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयप्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची संधी राष्ट्रवादीनं सोडली नाही. यानंतर अखेर जादा 3 सिलिंडरना सबसिडी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.. मात्र त्यातही केवळ एका लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाच याचा लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं..
गरिबांना दिलासा आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा हा निर्णय कॅबिनेटनं घेतल्यानंतर, तातडीनं याचं श्रेय लाटण्याची तयारीही सुरु झाली. दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रकं काढतं, हा निर्णय आपल्यामुळेच झाल्याचा दावा केला. काँग्रेसही यात मागे नव्हतीच.. खरंतर वर्षाला सहा सिलिंडर मोठ्या कुटुंबाला पुरतीलच कसे, असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येतोय, त्यातही आनंदवन सारख्या सामाजिक संस्थांना काय न्याय द्यायचा, याबाबत माध्यमातून ओरड होऊनही सरकारनं निर्णय घेण्यास उशीर केला. त्यातही जो निर्णय घेतला, त्यात मध्यमवर्गीय आणि अनेक सामाजिक संस्थांवर झाला तो अन्यायच.. मात्र यातही श्रेयाची लढाई सुरु झाल्यानं, सत्ताधा-यांचं जनतेसमोर हसंच झालंय.
First Published: Thursday, November 8, 2012, 19:43