Last Updated: Thursday, January 10, 2013, 08:34
www.24taas.com, मुंबईआजच्या कॅबिनेटच्या बैठकीत नवे औद्योगिक धोरण आणि महिलांवरील अत्याचारांवरून गृहमंत्री आर आर पाटील आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जोरदार खडाजंगी झाली.
शेतक-यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्यावर श्रीमंतांनी घरे ऊभारून कोट्यवधी रूपये कमवायचे हा कुठला न्याय असा सवाल आबांनी राणेंना केलाय. त्यावर आबांच्या सूचनांचे स्वागत करत सामाजिक बांधिलकी आम्हालाही आहे मात्र चांगल्या भाषणातून नव्हे तर उद्योगांतून गरीबी दूर होते असा टोला राणेंनी लगावला.
तसंच महिलांवरील अत्याचारांवरून राणेंनी आबांना टार्गेट केलं. राज्यातल्या पोलिसांवर कुणाचाही वचक नाही आणि पोलिसांचा कुणावरही धाक नसल्याचा टोला हाणला. तर एपीआयच्या बदलीचेसुद्धा अधिकार माझ्याकडे नाहीत, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे खेटा माराव्या लागतात असं मार्मिक उत्तर आबांनी दिलंय.
तसंच बदलीसंदर्भातल्या राणेंच्या नेतृत्वात नेमलेल्या समितीचा अहवाल लवकर द्या अशी मागणी करत आबांनी राणेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसंच समिती नेमून गृहमंत्र्यांचे अधिकार वाढवण्याचा उपाहासात्मक टोलाही आबांनी राणेंना लगावलाय.
First Published: Wednesday, January 9, 2013, 18:46