Last Updated: Wednesday, August 21, 2013, 09:48
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकूल वातावरणात पुत्र जयराज साळगावकर यांनी जयंतरावांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साळगांवकरांना श्रद्धांजली वाहिली.
मंगळवारी पहाटे हिंदुजा रूग्णालयात त्यांचे निधन झाले. काल सकाळपासूनच माटुंग्यातल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या असंख्य चाहत्यांची रीघ लागली होती. संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. वाटेतही अनेकजणांना त्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं काल मंगळवारी पहाटे हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या कॅलेंडरचे संस्थापक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये १ फेब्रुवारी १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. जयंत शिवराम साळगावकर हे त्यांचं पूर्ण नाव. साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचं परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका प्रसिद्ध केली.
सोमवारी साळगावकर यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते चिंतेत होते. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. तसंच मराठी व्यापारी मित्रमंडळाचे सर्वेसर्वा म्हणूनही त्यांची ओळख होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 21, 2013, 09:48