रात्री १२ वाजेपर्यंत... `गरबा घुमो छे...`, garba till 12 am

रात्री १२ वाजेपर्यंत... `गरबा घुमो छे...`

रात्री १२ वाजेपर्यंत... `गरबा घुमो छे...`
www.24taas.com, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवरात्रोत्सवात तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरसाठी परवानगी नाकारलीय. मात्र, खाजगी इमारतींत १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्यावर गरबा घुमायला मुख्यमंत्र्यांनी होकार दिलाय.

काँग्रेस खासदार संजय निरुपम आणि गायिका फाल्गुनी पाठक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यासाठी भेट घेतली. मात्र, दरवर्षीप्रमाणे केवळ दोनच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर लावता येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. खासगी इमारतींमध्ये मात्र रात्री १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्य वाजवण्यास राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवण्याची तयारी केलीय. मात्र, मोठ्या मैदानांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना तसंच ध्वनिक्षेपकांना ही परवानगी मिळणार नाही. मुंबईसह राज्यात अन्यत्र खासगी इमारतींच्या आवारात दांडिया कार्यक्रम चालतो. रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक सुरू असल्यास पोलीस कारवाई करतात. ध्वनिक्षेपकाला परवानगी नको, पण नुसती पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी होकार देतानाच डेसिबलचे नियंत्रण पाळण्याची विनंतीही केलीय.

न्यायालयीन कचाट्यात सापडू नये म्हणून याबाबतच आदेश मात्र जाहीर करण्यात येणार नाहीत. पण, रात्री १२ वाजेपर्यंत वाद्ये वाजवणाऱ्यांवर कारवाई करू नका, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय.


First Published: Tuesday, October 9, 2012, 08:42


comments powered by Disqus