दर्ग्याच्या बंदी विरोधात मुस्लिम महिला संघटना, Haji Ali Dargha should enter - Women`s organization

दर्गा बंदी विरोधात मुस्लिम महिला मैदानात

दर्गा बंदी विरोधात मुस्लिम महिला मैदानात
www.24taas.com,मुंबई

मुंबईतल्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या आतील भागात महिलांना प्रवेश नाकारण्याच्या विरोधात आता मुस्लिम महिला संघटना मैदानात उतरल्यात. दर्ग्यामध्ये महिलांना पुरुषांबरोबर समान हक्क मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय.

चहुबाजूंनी समुद्राच्या पाण्यानं घेरलेला मुंबईतील सूफी संत पीर हाजी अली शाह बुखारी यांचा दर्गा सध्या वादाच्या भोव-यात सापडलाय. महिलांना या दर्ग्यामधल्या मजारला स्पर्श करुन प्रार्थना करण्यास बंदी घालण्यात आल्यानं हा वाद शिगेला पोहचलाय.

मुंबईतल्या एका मुस्लिम महिला संघटनेनं या निर्णयाला विरोध केलाय. या संघटनेनं हाजी अली ट्रस्टला पत्र लिहून पुरुषांप्रमाणेच महिलांनाही दर्ग्यामध्ये प्रवेश देण्यात यावा अशी विनंती केलीय.

मुस्लिम धर्म कायद्यानुसार महिलांना मजारला स्पर्श करण्यास मनाई असल्याचं मत हाजी अली ट्रस्टचं आहे. परंतु दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलेलं नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

सैय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या आठवणी प्रित्यर्थ १४३१ मध्ये हा दर्गा बांधण्यात आलाय. रोज हजारो हिंदू-मुस्लिम भाविक याठिकाणी भक्तिभावानं येतात. त्यामुळं महिलांसाठी घातलेलं बंधन लवकर उठवून वाद मिटवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येतंय.

First Published: Wednesday, November 7, 2012, 14:28


comments powered by Disqus