Last Updated: Tuesday, May 28, 2013, 19:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनेनं आठवले आणि भाजप नेत्यांनाच कानपिचक्या दिल्यानंतर आता महायुतीतच गोंधळ निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर आज आठवलेंनी मुंडेंची भेट घेतल्यानं या गोंधळात आणखी भर पडली. मनसेला बरोबर घेतलं तर त्यांना कुणाच्या जागा सोडायच्या यावरून होणाऱ्या संभाव्य वादाची झलक यानिमितानं पहायला मिळाली.
ठाकरे बंधूंमध्ये गडकरींना पूल बांधायचाय आणि त्यातला आठवलेंचा अडथळाही दूर झालाय. उद्धव ठाकरेंनी पुढे केलेल्या हाताला आता राज यांच्या टाळीचीच प्रतीक्षा आहे असं वाटत असताना सामनाच्या संपादकीयातून शिवसेनेनं वेगळीतच भूमिका मांडली आणि महायुतीतला गोंधळ आणखी वाढला. मनसेला जवळ घेण्याआधी भाजप आणि रिपाईंतील गटबाजीवर शिवसेनेनं चांगलेच टोले लगावले.
सामनाच्या संपादकीयातून मांडलेली भूमिका भाजप आणि आठवलेंसाठीही काहीशी अनपेक्षित होती. त्यामुळे अस्वस्थ आठवलेंनी गोपीनाथ मुंडेंची भेट घेऊन तातडीनं चर्चा केली. अर्थात या विषयावर बोलताना दोन्ही नेत्यांची भूमिका सारवासारव करणारी होती.
मित्रपक्ष मनसेसाठी आतूर असले तरी त्यांच्यासाठी जागा कोण सोडणार ? हा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेनं संभाव्य तिढ्याचेही संकेत दिले. हा सगळा गोंधळ पाहता ठाकरे बंधुंमध्ये पूल बांधणे वाटतं तितकं सोपं नाही याचा अंदाज भाजप रिपाइंच्या नेत्यांना आला असेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 19:23