Last Updated: Tuesday, November 12, 2013, 11:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपद्म पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वादावर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकरांनी कुणाचंही नाव न घेता नव्या वादाला तोंड फोडलंय. गुजरातमध्ये ज्यांनी जातीय उद्रेक घडवला त्या पक्षांना आणि नेत्यांना जाहीर पाठिंबा देणा-यांना दिलेले पद्मश्री, पद्मभूषण आणि भारतरत्नसारखे नागरी पुरस्कार तत्काळ काढून घ्यावेत, अशी मागणी जनार्दन चांदुरकर यांनी केलीय.
चांदूरकर यांनी ही मागणी करताना थेट भारतरत्न पुरस्कार प्राप्त लता मंगेशकर यांचं नाव घेतले नसले तरी त्यांच्या मागणीचा रोख त्यांच्याकडेच असल्याचं स्पष्ट होतंय. काही दिवसांपूर्वी पुण्यात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता चांदुरकरांनी अशी मागणी केलीय. तसंच असे प्रकार थांबले नाहीत तर मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.
मोठ्या व्यक्तींना सर्व धर्माच्या लोकांचे प्रेम मिळालेले असते. त्यामुळे अशा व्यक्तींने थेट जातीयवादीची पाठराखण करणे हे योग्य नाही. यामुळे त्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव कमी होतोच. मात्र, देशातील एकात्मतेला धक्का बसतो, असे चांदुरकर म्हणालेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, November 12, 2013, 11:43