एलबीटीविरोधात व्य़ापारी महासंघांची बंदची हाक, LBT, Bandh , LBT Tax

एलबीटीविरोधात व्य़ापारी महासंघांची बंदची हाक

एलबीटीविरोधात व्य़ापारी  महासंघांची बंदची हाक
www.24taas.com, मुंबई

एलबीटीविरोधात राज्यातले व्यापारी आक्रमक झालेत. एलबीटीला विरोध करण्यासाठी व्य़ापारी महासंघानं आज आणि उद्या बंदची हाक दिलीय.

सुरुवातीला व्यापा-यांनी २२ तारखेपासून बेमुदत बंदचे आवाहन केलं होतं. मात्र त्यानंतर LBT च्या नियमांत मुख्यमंत्र्यांनी काही सुधारणा केल्या आहेत. त्याची घोषणाही त्यांनी विधिमंडळात केलीय. व्यापा-यांनी मात्र त्या सुधारणांबाबत सरकारने जीआर काढावा अशी मागणी केलीय. सरकारनं ७ मे पर्यंत जीआर काढला नाही. तर आठ मे पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा व्यापा-यांनी दिलाय.

मुंबई व नागपूरमध्ये मात्र बेमुदत बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. या दोन शहरांतील सुमारे सात लाख दुकाने बंद राहणार असल्याने तेथील सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.


फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र अर्थात फॅमच्या झेंड्याखाली राज्यातील सुमारे ७५० व्यापारी संघटना एकवटल्या असून, एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा अध्यादेश काढावा, एलबीटीतील जाचक अटी दूर करण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

याशिवाय मूल्यवर्धित करामध्ये अधिभार लावून एलबीटी कायदा त्यात विलिन करावा, अशीही मागणी होत आहे. एलबीटीबाबत नेमलेल्या उच्च समितीने व्यापार्‍यांच्या अनेक मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेखही केला नसल्याचा आरोप करीत सरकारने ठोस निर्णय द्यावा, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

एलबीटीच्या विरोधात व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदला नवी मुंबईतील एपीएमसीतील सर्व व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून तीन दिवस एपीएमसी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे. सामान्य जनतेला बंदचा त्रास होऊ नये म्हणून अत्यावशक सेवांना या आंदोलनातून वगळले आहे.

First Published: Monday, April 22, 2013, 08:16


comments powered by Disqus