Last Updated: Friday, May 10, 2013, 20:46
www.24taas.com, मुंबई भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष मधु चव्हाण यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिलाय. मधु चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपांमुळे आपण व्यथीत झालो असून आपण आपल्या पदांचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा हा राजीनामा मंजुरही केला आहे. काळाचौकी पोलिसांत एका महिलेनं मधु चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला. लग्नाचे आमीष दाखवून चव्हाण आपल्यावर गेल्या २० वर्षांपासून बलात्कार करत असल्याची लेखी तक्रार या महिलेने काळा चौकी पोलीस ठाण्यात नोंदवलीय.
पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं भाजपमध्येही खळबळ उडाली. मात्र, त्यावर भाजपनं कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आपल्याला राजकीय जीवनातून उठवण्यासाठी हे आरोप केल्याचा दावा मधु चव्हाणांनी केलाय. चव्हाण यांच्यावर यापूर्वीही शोषणाचे आरोप करण्यात आले होते.
First Published: Friday, May 10, 2013, 20:46