कुपोषणाची मुंबईत धडक; चिमुकलीनं गमावले डोळे, malnutrition in mumbai, girl lost her eyes because of malnutrition

कुपोषणाची मुंबईत धडक; चिमुकलीनं गमावले डोळे

कुपोषणाची मुंबईत धडक; चिमुकलीनं गमावले डोळे
www.24taas.com, मुंबई

कुपोषणाचं संकट मुंबईच्या दाराशी येऊन ठेपलंय. मुंबईत कुपोषणामुळे एका लहानग्या मुलीला अंधत्व आलंय. नंदिनी मायकल नाडर असं या मुलीचं नाव आहे. साडेचार वर्षाच्या नंदिनीचं वजन आहे फक्त नऊ किलो...

कुपोषणामुळे मुंबईत दररोज शंभरावर बालके हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नंदिनी मायकल नाडर... मुक्काम पोस्ट दक्षिण मुंबईतील वाडीबंदर गेटसमोरील फूटपाथ... वय अवघं साडेचार वर्ष... अशक्तपणामुळे नंदिनीला तीन दिवसांपासून जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. कुपोषणामुळे नंदिनीची दृष्टी गेल्याचं डॉक्टरांनी निदान केलंय. मुलीच्या अंधत्वाचा आघात सहन न झाल्याने या चिमुकलीला घेऊन तिच्या आई-वडिलांनी रुग्णालयातूनच पळ काढला, अशी माहिती जेजे रुग्णालयाचे बालचिकित्सक डॉ. एन. आर. सुटे यांनी दिलीय.

कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललीये. राज्यात कुपोषणाची संख्या साडे दहा लाखांहून अधिक आहे. यात सव्वा लाख बालके तीव्र कुपोषित गटात मोडतात. गेल्या वर्षी कुपोषणामुळे तब्बल २४ हजार ३६५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक प्रमाण मेळघाट, गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार या जिल्हयातील आहे. तर फक्त मुंबईत दररोज शंभरावर बालके हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचं आढळून आलंय.

राज्य सरकारकडून नेहमीच कुपोषण आटोक्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र, नंदिनीच्या या उदाहरणामुळे राज्य सरकार आणि त्याबरोबरच मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचंही पितळ उघडं पडलंय. आदिवासी भागातली ही गंभीर समस्या आता राज्याच्या राजधानीत अर्थात मुंबापुरीतही येऊन ठेपल्याने आरोग्य यंत्रणांची मात्र झोप उडतेय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published: Thursday, October 25, 2012, 19:56


comments powered by Disqus