लग्नात उधळपट्टी केली तर तीन वर्षांचा कारावास!, marriage big expenses lead to jail

लग्नात उधळपट्टी केली तर तीन वर्षांचा कारावास!

लग्नात उधळपट्टी केली तर तीन वर्षांचा कारावास!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तुम्ही लग्न करत आहात. तर सावधान! कारण लग्नातला थाटमाट आता महागात पडू शकतो. लग्नात पैशाची उधळपट्टी केली तर किमान तीन वर्षांची कारावासी शिक्षा भोगावी लागेल. तशी नव्याने येणाऱ्या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक पुढील अधिवेशनात मांडण्यात येऊन त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

आयुष्यातला मोठा अन् आनंदाचा प्रसंग म्हणजे लग्न! वर असो वधू, दोन्ही पक्षांकडील घरात लग्नाची तयारी मोठ्या लगबगीने सुरू असते. लग्नाच्या धामधुमीत उत्साह ओसंडून वाहत असतो. या सार्‍यांसमोर पैशाचे मोल तेव्हा गौण असते. कारण, लग्न एकदाच करावं लागतं, असं गंमतीनं म्हटलं जातं. परंतु, लग्नातील या वारेमाप उधळपट्टीवर आता लवकरच लगाम बसणार आहे. लग्नातील खर्चावर मर्यादा घातली जाणार आहे.

या मर्यादेचे उल्लंघन करण्यासाठी तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि १ लाख रुपये दंड अशी तरतूद केली जाणार आहे. याविषयीचे विधेयक तयार करण्यात आले आहे. या विधेयकाला कायद्यात रूपांतरित करण्यासाठी ते आगामी राज्य विधिमंडळ अधिवेशनात मांडले जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या मुलाच्या लग्नात प्रचंड उधळपट्टी झाली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही हा खर्च पाहिल्यानंतर डोळे वठारले होते. याबद्दल पवार यांनी जाधव यांची कानउघाडणीही केली होती. यानंतर नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांनीही मुलीच्या लग्नाचा शाही बार उडवताना पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असतानाच लग्नात झालेल्या या वारेमाप खर्चांची सर्वत्र टीका करण्यात आली होती.

या उधळपट्टीची नोंद घेऊनच सरकारने लग्नातील खर्चाला मर्यादा घालण्यासाठी नवीन कायदा करण्यासाठी तयारी केलेली आहे. भाजपाचे आमदार गिरीश बापट यांनी हे विधेयक तयार केले आहे. ते आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडले जाणार आहे. सजावट, खानपान, भेटवस्तू, फटाके या सर्वांवर लग्नात किती खर्च करायचा, याची मर्यादा नव्या कायद्यात असणार आहे. नियमांचा भंग करणार्‍यांसाठी शिक्षेची तरतूदही करण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 9, 2013, 09:21


comments powered by Disqus