micro atm & Employment Plan by government

फिरतं ‘एटीएम’ करणार ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती!

फिरतं ‘एटीएम’ करणार ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ग्रामीण भागात अजूनही उपलब्ध नसलेली एटीएमची सुविधा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीचा गंभीर प्रश्न यांचा ताळमेळ घालत सरकारनं ग्रामीण भागात ‘मायक्रो एटीएम’ ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.

ग्रामीण भागातील जनतेला एटीएमची सेवा नसल्याने अडीअडचणीच्या वेळी पैसे काढणे कठीण जाते. याच प्रश्नावर उत्तर म्हणून रोजगार हमी योजने अंतर्गत १५ हजार ‘मायक्रो एटीएम’ सुरु करण्यात येणार आहेत. रोहयोची कामं सुरु असलेल्या गावांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. एटीएमची सुविधा उपलब्ध नसल्यानं पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांची असुविधा लक्षात घेऊन ही खास योजना आखण्यात आलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ‘आधार’चे अध्यक्ष नंदन निलेकणी यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ही चर्चा झाल्याची माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यानं दिली.

सध्या ५०० मायक्रो एटीएम राज्यात असून आणखी १५ हजार मशीन ग्रामीण भागात देण्यात येतील. प्रत्येक बँकेला असे एटीएम देण्यात येणार आहे. एका मशीनची किंमत २० ते २५ हजार रुपये आहे.

काय आहे ‘मायक्रो एटीएम’ सेवा
नवे एटीएम मशीन शहरातील एटीएमपेक्षा वेगळे आहे. बँकेचा कर्मचारी एटीएम मशीन घेऊन ग्राहकाच्या घरी जाईल. त्या मशीनमध्ये ग्राहकाने कार्ड स्वाईप करून रकमेचा आकडा टाकायचा. त्यानंतर कर्मचारी ग्राहकाला संबंधित रक्कम देईल आणि त्याची नोंद बँकेत करेल. बँकेमध्ये यासाठी एक दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात येणार असून त्यावर संपर्क साधल्यास एटीएम मशीन ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 24, 2013, 12:09


comments powered by Disqus