मुंबई लोकल नवीन रंगात, सेकंड क्लासही महागणार, Mumbai local train new paint, second class Ticket expe

मुंबई लोकल नवीन रंगात, सेकंड क्लासही महागणार

मुंबई लोकल नवीन रंगात, सेकंड क्लासही महागणार
www.24taas.com,मुंबई

मुंबईच्या लाइफलाइनचा रंग आता बदलणार आहे. मुंबईच्या लोकल आता गडद जांभळ्या रंगात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सुरुवातीला दोन नवीन लोकल मार्च-एप्रिल २०१३ पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. दरम्यान, सेकंड क्लासच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल सेवेच्या फर्स्ट क्लासमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या भाडेवाढीनंतर आता फर्स्ट तसेच सेकंड क्लासच्या रेल्वे प्रवाशांना अधिभाराच्या रूपाने तिकीट, पासदरातील वाढीस सामोरे जावे लागणार आहे . जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी राज्य सरकारच्या आग्रही भूमिकेमुळे रेल्वे मंत्रालय नजीकच्या काळात किमान १६ टक्के भाडेवाढ करणार आहे.

पहिल्या १० किमीचा प्रवास अधिभारमुक्त असून त्यापुढील प्रवासासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यानुसार, सेकंड क्लासच्या दैनंदिन तिकिटांवर किमान एक रुपये तर फर्स्ट क्लासच्या तिकिटांवर दोन रुपये अधिक मोजावे लागतील. पासधारकांनाही हा जादा आकार द्यावा लागणार आहे. सेकंड क्लासच्या मासिक पाससाठी किमान १० ते २० रुपये जास्त मोजावे लागतील. तर फर्स्ट क्लासच्या मासिक पाससाठी किमान २० ते ४० रुपये भरावे लागतील.

दोन नवीन लोकल मार्च-एप्रिल २०१३ पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. एमयुटीपी-२ अंतर्गत टप्प्याटप्याने बम्बार्डिअर कंपनीच्या ७२ नवीन लोकल मुंबईकरांच्या दिमतीला येणार आहेत. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या कंपनीला रंग निवडीचे काम देण्यात आलं.

तीन महिने त्यावर काम करण्यात आल्यानंतर सध्याच्या फिक्कट जांभळ्या रंगाऐवजी गडद जांभळा रंगाचा पर्याय निव़डण्यात आला. त्याशिवाय लोकलच्या समोरचा भाग अधिक पिवळा असणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जुन्या लोकल हद्दपार होऊन त्याची जागा जर्मन बनावटीच्या सिमेन्स कंपनीच्या नवीन लोकल्सनी घेतली.

मात्र पाच वर्षापूर्वी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या लोकलचा फिक्कट जांभळा रंग तंबाखू आणि पानाच्या पिचका-यांनी अल्पावधीतच उडाला. त्यामुळं रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First Published: Tuesday, November 20, 2012, 13:21


comments powered by Disqus