`तो` आवाज जिंदालचाच!, mumbai terrorist attack: it was jindal voice

`तो` आवाज जिंदालचाच!

`तो` आवाज जिंदालचाच!
www.24taas.com, मुंबई

मुंबई हल्ल्याचा आरोपी अबू जिंदालच्या आवाजाची ओळख पटलीय. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले जिंदालच्या आवाजाचे नमुने २६/११च्या दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या आवाजाशी मिळताजुळता आहे.

मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कसाब आणि त्याचे साथीदार रक्ताची होळी खेळत असताना त्यांना निर्देश मिळत होते अबू जिंदालचे... याच अबू जिंदालच्या हिंदी आणि उर्दू आवाजाचे नमुने मुंबई क्राइम ब्रांचने जुलै महिन्यात घेतले होते. हे नमुने २६/११च्या त्या आवाजाशी मेळ खातात का? हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. आता २६/११चा आवाज अबू जिंदालचाच असल्यावर शिक्कामोर्तब झालंय.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीत दहशतवाद्यांच्या कंट्रोलरुममध्ये बसून निर्देश देणाऱ्या या पाच आवाजांपैकी एक आवाज अबू जिंदालच्या आवाजाशी मेळ खातोय. ‘हा तर फक्त ट्रेलर असून फिल्म बाकी आहे’ असं जिंदाल कसाब आणि त्याच्या साथीदारांना सांगत होता. टीव्हीवर सुरु असलेल्या प्रत्येक बातमीची माहिती जिंदालनं ओबेरॉय हॉटेल, नरीमन हाऊस आणि हॉटेल ताजमध्ये असणाऱ्या या दहशतवाद्यांना दिली होती. मुंबईतल्या २६/११च्या हल्ल्याच्या वेळच्या संभाषणाचं रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांकडे होतं. त्यानंतर पोलिसांकडे असलेले जिंदालचे आवाजाचे नमुने आणि २६/११चे रेकॉर्डिंग जुळल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलंय. याबाबतचा रिपोर्ट क्राइम ब्रांचला मिळालाय.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही झी २४ तासशी बोलताना याला दुजोरा दिलाय. अबू जिंदालला या वर्षी जून महिन्यात सौदीतून भारतात आणण्यात आलं. मूळ बीडचा असणाऱ्या अबू जिंदालवर २६/११च्या कटात सामील असण्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे एजाज नक्वी या जिंदालच्या वकीलांनी आवाज मेळ खात असल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुंबई क्राईम ब्रांचसोबतच ‘एटीएस’सुद्धा अबू जिंदालची चौकशी करतेय. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे.

First Published: Wednesday, December 26, 2012, 10:03


comments powered by Disqus