`प्रामाणिकपणा`ची पर्स टेस्ट; मुंबई ठरली बेस्ट!, Mumbaikars make India proud in honesty test

`प्रामाणिकपणा`ची पर्स टेस्ट; मुंबई ठरली बेस्ट!

`प्रामाणिकपणा`ची पर्स टेस्ट; मुंबई ठरली बेस्ट!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईच्या बाबतीत कुणी काहीही म्हणो पण, प्रामाणिकपणाच्या बाबतीत मात्र मुंबईनं नेहमीच आपली शान राखलीय. मुंबईनं प्रामाणिकपणाच्या बाबतीत जगभरात दुसऱ्या नंबरवर स्थान पटकावलंय. इंग्रजी मॅगझिन ‘रिडर्स डायजेस्ट’नं केलेल्या एका सर्व्हेमध्ये मुंबईकरांची मान पुन्हा उंचावलीय.

आता, मुंबई हे केवळ भरतातलं एक आकर्षक शहर उरलेलं नाही तर प्रामाणिकपणाही इथं खच्चून भरलाय हे, या सर्व्हेवरून स्पष्ट दिसतंय. ‘रिडर्स डायजेस्ट’नं केलेल्या सर्वेक्षणात फिनलँडच्या ‘हेलसिंकी’ शहरानं प्रामाणिकपणात पहिला क्रमांक मिळवलाय. प्रामाणिकपणा तपासण्यासाठी हरवलेल्या पर्स परत मिळतात की नाही, हा निकष ठरवण्यात आला होता. हेलसिंकीमध्ये १२ पर्स हरवले असतील तर त्यातील जवळपास ११ पर्स परत मालकाच्या स्वाधीन केल्या जातात.

भारतातील काही ठिकाणी जर तुमची पर्स हरवली तर ती परत जशीच्या तशी तुमच्या हातात पडणं तसं कठिणचं... जर ती पर्स कुणाला मिळाली तर त्यानं तुमच्याशी संपर्क साधून परत केली तर तुमचं नशीबच समजा... पण देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मात्र हा चमत्कार तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. मुंबईत १२ पर्स हरवल्या असतील तर त्यातील ९ पर्स परत मालकाकडे येतात. ज्यांना या पर्स मिळाल्या असतील ते लोक या पर्सेस प्रामाणिकपणानं परत करतात.

प्रामाणिकपणाच्या या ‘पर्स टेस्ट’मध्ये हंगेरीच्या ‘बुडापेस्ट’ आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्कला संयुक्तपणे तीसरा क्रमांक देण्यात आलाय. इथं १२ पैकी ८ पर्स पुन्हा त्यांच्या मूळ मालकाला परत केल्या जातात. सर्व्हेसाठी रिडर्स डायजेस्टनं जगभरातील १६ शहरांची निवड करून तिथं पर्स टाकल्या होत्या... आणि त्यापैकी किती पर्स परत मिळाल्या यावर ही प्रामाणिकपणाची चाचणी केली गेली. यासाठी प्रत्येक पर्समध्ये मोबाईल नंबर, एक कौटुंबिक फोटो, कूपन, बिजनेस कार्ड आणि ५० अमेरिकन डॉलरच्या बरोबरीची रक्कम टाकली गेली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 26, 2013, 11:22


comments powered by Disqus