Last Updated: Friday, September 14, 2012, 17:47
www.24taas.com, मुंबईमहाराष्ट्रात नेतृत्वबदलाचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले आहेत. नेतृत्व बदल झाल्यास पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा दिल्ली जाऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाचे संकेत मिळत आहेत. तर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राणे हे कालपासून राजधानी दिल्लीत असून, शुक्रवारी दुपारी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रात पुन्हा आणण्याबाबत मनमोहन सिंग हे आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसला मुख्यमंत्रिपदासाठी चांगला `चेहरा` मिळत नसल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात ठेवण्याची शक्यता अधिक आहे.
असे असले तरी विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्त्वाची उणीव भासत आहे. या पार्श्वभूमीवर, राणे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन मी राज्याला कार्यक्षम नेतृत्त्व देऊ शकतो, याची त्यांनी हमी दिली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
First Published: Friday, September 14, 2012, 17:14