बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!, No Aadhaar card , No Salary

बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!

बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!
www.24taas.com,मुंबई

मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.

राज्यात शासनाने कर्मचाऱ्यांना आधार कार्डची सक्ती केली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच आधार कार्डसक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व कर्मचार्यांनना लवकरात लवकर आधार कार्ड काढून घेण्याची सूचना प्रशासनाने केली होती.

तसेच ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये परिपत्रक काढून वेतन कापण्यात येईल, अशी तंबी दिली होती. मात्र, पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड काढलेले नाही. याचा फटका २० हजार ८०० कर्मचाऱ्यांना बसणार आहे. डिसेंबर महिन्याच्या वेतनाला मुकावे लागले आहे.

पालिकेच्या सव्वा लाख कर्मचाऱ्यां पैकी २० हजार ८०० जणांनी आधार कार्ड काढलेले नाही. त्यामुळे आयुक्त सीताराम कुंटे आणि अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्या आदेशानुसार डिसेंबर महिन्याचे वेतन रोखण्यात आलेले आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आधार कार्डसाठी नाव नोंदविले असेल, तर त्यांनी पावती दाखवूनही पगार मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पालिकेच्या या निर्णयाला औद्योगिक न्यायालयात आव्हान देऊन व्याजासकट पगार घेऊ, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिलाय. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, January 2, 2013, 17:21


comments powered by Disqus