मोनिकाच्या मदतीसाठी... पालिकेचं एक पाऊल मागे!, no help to monica more from BMC

मोनिकाच्या मदतीसाठी... पालिकेचं एक पाऊल मागे!

मोनिकाच्या मदतीसाठी... पालिकेचं एक पाऊल मागे!


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राजकीय नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर कसा पडतो याचं ढळढळीत उदाहरण समोर आलंय. घाटकोपर रेल्वे अपघातात दोन हात गमावलेल्या मोनिका मोरेला मदत करुन तिचे अश्रू पुसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, मुंबई महापालिकेनं दिलेलं आश्वासन न पाळून तिची थट्टा मांडलीय.

१६ वर्षाच्या मोनिका मोरेच्या डोळ्यांतली आसवं थांबता थांबत नाहीत... घाटकोपर रेल्वे स्टेशनववर लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात तिचा पाय घसरला आणि धावत्या ट्रेनखाली ती आली. तिचे दोन्ही हात या अपघातानं हिरावून घेतले आणि तिच्या जीवनावर मोठा आघात झाला. मात्र, आता केईएममध्ये उपचार घेणाऱ्या मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांवर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळलाय. कारण, हॉस्पिटल प्रशासनाने मोनिकाच्या पालकांना तिच्या उपचारासाठी होणाऱ्या साठ लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितलंय. याहून कहर म्हणजे उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कमेची पूर्तता धर्मादाय संस्थेकडून करावी, असं पत्रही पालिकेनं मोनिकाच्या पालकांना दिलंय.

मोनिकाच्या अपघाताचं वृत्त झळकताच राजकीय नेत्यांनी मोनिकाची भेट घेतली. माध्यमांच्या कॅमेऱ्यापुढे मदतीचं आश्वासनही दिलं. त्यापैंकी एक होते मुंबई महापालिकेचे महापौर सुनील प्रभू... मोनिकाच्या उपचाराचा आणि पुनर्वसनाचा खर्च पालिका उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र, आता पालिका आणि महापौरांना या आश्वासनाचा विसर पडलाय. पालिकेच्या या कृतीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केलाय. तसंच पालिकेला जमत नसेल तर आम्ही समर्थ असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय.

`झी मीडिया`च्या आवाहनाला प्रतिसाद देत मोनिकाला मदतीचा हात मिळावा आणि  कृत्रिम हात बसवता यावे यासाठी अनेकांनी तिला आर्थिक मदत देऊ केली. अशा परिस्थितीत मुंबई महापालिका आणि महापौरांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करुन एक प्रकारे थट्टाच मांडलीय. त्यामुळं निव्वळ पब्लिसिटी आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महापौरांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं का? असा सवाल उपस्थित होतोय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 9, 2014, 19:17


comments powered by Disqus