Last Updated: Thursday, November 28, 2013, 16:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेला दोन महिने उलटले तरी मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसान भरपाई, निवारा किंवा नोकरी यापैंकी काहीही मिळालेलं नाही. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं आपली फसवणूक केल्याचा आरोप डॉकयार्ड इमारत दुर्घटनाग्रस्तांनी केलाय.
रक्ताच्या नात्याची माणसं इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि जी कुणी वाचली, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर गायब झालंय. ही व्यथा आहे डॉकयार्ड इमारत दुर्घटनेतील मृत आणि जखमींच्या नातेवाईकांची... महापालिका आणि राज्य सरकारनं नुसतीच कोरडी आश्वासनं दिली, पण ती पाळली नाहीत, हा या दुर्घटनाग्रस्तांचा आक्रोश आहे.
अशाही कहाण्या... अखिलेश शिंगाडे मुंबई महापालिकेत आरोग्य विभागात काम करतात. त्यांची नमिता नावाची पत्नी बाळंतपणासाठी वडिलांच्या घरी आली होती. दुर्दैवाने डॉकयार्ड इमारत कोसळल्यानंतर तिचादेखील बळी गेला. परंतु, पोलिसांनी पंचनाम्यात अखिलेशचं नाव अशोक केल्यामुळे त्यांना मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं घोषित केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
अखिलेश शिंगाडेचे मेव्हणे
तुषार पवार यांचे आई, वडील, बहीण, भाऊ, आजीसह घरातील सात जण या दुर्घटनेत दगावले. महापालिकेनं नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, पालिकेनं अद्याप तुषारला नोकरीत सामावून घेतलेलं नाही. दुसरीकडे मृत आणि जखमी पालिका कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे मात्र कापले गेलंय.
सुनील कांबळे त्यांचे भाऊ, वहिनी, मुलगी, भाची आणि श्रध्दा, सिमरन या दोन मुली दुर्घटनेत जखमी झाले. महापालिका आणि म्हाडानं भायखळ्यात घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ते घर अद्यापही न मिळाल्यानं घाटकोपर इथल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांना राहावं लागतंय. सध्या जखमींच्या औषधोपचाराचा खर्चही सुनील कांबळे यांना कर्ज काढून करावा लागतोय.
डॉकयार्ड इमारत दुर्घटनेतील ढिगारा उपसण्याचे काम अजूनही सुरू आहे. या ढिगाऱ्यात आपल्या कुटुंबीयांशी संबंधित कागदपत्रांचाही कुटुंबीय शोध घेत आहेत. मात्र, पोलीस पालिकेच्या गलथान कारभारामुळे त्यांचं उरला-सुरला किडुकमिडुक संसारही गायब झालाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 28, 2013, 16:54