Last Updated: Thursday, August 15, 2013, 17:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसिंधुरक्षक पाणबुडी दुर्घटनेला 40 तास उलटून गेले तरी अद्याप 18 बेपत्ता नौसैनिकांचा शोध लागलेला नाही... त्यामुळे हे सर्वजण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जातेय. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीवर जिवंत मिसाईल्स असल्यानं धोका अजूनही टळलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून बाकीच्या युद्धनौका नौदल डॉकयार्डबाहेरच्या समुद्रात पार्क करण्यात आल्यात....
नौदलाच्या सिंधुरक्षक पाणबुडीला लागलेली भीषण आग आणि स्फोटानंतर सुमारे 500 कोटी रूपयांच्या पाणबुडीला जलसमाधी मिळालीय. ही दुर्घटना घडली तेव्हा या पाणबुडीवर निखिलेश पाल, आलोक कुमार, व्यंकटराज हे 3 वरिष्ठ नौदल अधिकारी आणि बी. सीताराम, एम. हल्दर, ई. विकास, व्ही. विष्णू, डी. नरूत्तम, ए. के. सिंग, एल. लॉरेन्स, एस. कुमार, ए. शर्मा, टी. राजेश, डी. प्रसाद, के. सिंग, एस. कुमार, के. सी. उपाध्याय, टी. सिन्हा हे 15 नौसैनिक होते.
त्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाचे डायवर्स पाणबुडीचा दरवाजा उघडून आतमध्ये गेलेत. बेपत्ता नौसैनिकांचा शोध घेण्यासाठी बुधवारपासून प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नांना दुर्दैवाने अद्याप यश आलेले नाही..
स्फोट आणि आगीनंतर या पाणबुडीत समुद्राचे पाणी शिरू लागलेय. स्फोटांमुळे पाणबुडीचे अवशेष वितळल्याने शोधकार्यात अडथळे येतायत. आणखी गंभीर बाब म्हणजे बुडालेल्या सिंधुरक्षक पाणबुडीवर जिवंत क्षेपणास्त्रे असल्याने मोठा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून नेव्हल डॉकयार्ड रिकामा करण्यात आलाय.
सिंधुरक्षकसारखी पाणबुडी बुडाल्याने भारताच्या नौदल सामर्थ्याला मोठा धक्का बसलाय. 67 वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना, सिंधुरक्षक दुर्घटनेचे गालबोट जल्लोषाला लागलंय, एवढं नक्की....
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 15, 2013, 17:27