Last Updated: Wednesday, February 13, 2013, 14:47
www.24taas.com, मुंबई गॅसधारक आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. त्यामुळे पुढचा पूर्ण महिनाभर मुंबई, पुण्यातील सर्व आधार केंद्रांवर केवळ गॅसधारकांची आणि विद्यार्थ्यांचीच नोंदणी होणार आहे.
सामान्य लोकांना या महिन्यात आधार नोंदणीसाठी तारिख मिळाली असेल, तरी त्यांनी आधार केंद्रावर गर्दी करू नये, कारण त्यांची नोंदणी या महिन्यात न करता या महिन्यात केवळ गॅसधारकांची आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांचीच नोंदणी होईल, अशी माहिती युनिक आयडेन्टिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे उपसंचालक अजयभूषण पांडे यांनी दिलीय. गॅस सबसिडी आणि शिष्यवृत्तीचे फायदे मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. तसंच राज्य सरकारनंही विविध योजनांसाठी आधार सक्तीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडालीय. आधारकार्ड मिळवण्यासाठी आधार केंद्रांवर चांगलीच गर्दी दिसून येतेय. याचा फायदा काही दलालही उठवत आहेत.
पण, आत्तापर्यंत लोकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या आणि नोंदणी केलेली माहिती आधारपर्यंत पोहचविण्यात टाळाटाळ करणाऱ्या जवळपास ३०० केंद्रांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिलीय.
मुंबईतील सव्वाकोटी जनतेपैकी ७५ लाख लोकांना आत्तापर्यंत आधारचे वाटप करण्यात आलंय. पुढील आठ महिन्यांत आणखी ५० लाख लोकांची नोंदणी केली जाईल. राज्यात ५ कोटी लोकांची नोंदणी झाली असून डिसेंबरपर्यंत आधार केंद्र सुरू राहणार असल्याने लोकांनी आधार नोंदणीची चिंता करू नये, असं आवाहनही पांडे यांनी केलंय.
First Published: Wednesday, February 13, 2013, 14:45