Last Updated: Thursday, August 30, 2012, 19:09
www.24taas.com, मुंबई मुंबईत २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले असले तरी त्याला फाशी द्यायला जल्लादच नाही. त्यामुळे हे काम पोलिस दलातील एखाद्या हवालदाराला सोपविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही.
कसाब आणि त्याच्या नऊ सहका-यांनी २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. अंदाधुंद गोळीबार करत कसाबने अनेकांचे जीव घेतले होते. सध्या कसाब आर्थर रोड तुरुंगात असून त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. काल कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे कसाबच्या शिक्षेची लवकर अमलबजावणी व्हावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कसाबच्या फाशीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली तर त्याला फाशी एक हवालदार देऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
फाशीच्या शिक्षेची अमलबजावणी जल्लाद करतो. राज्यात शेवटची फाशी १९९५ मध्ये सुधाकर जोशी नावाच्या व्यक्तीस देण्यात आली होती. त्याने अलिबागमध्ये तीनजणांची क्रूरपणे हत्या केली होती. त्याला फाशी दिल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रात कोणालाच फाशी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यात जल्लाद उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत देशाच्या अन्य भागातून तात्पुरत्या स्वरुपात एखाद्या जल्लादाला बोलावता येईल किंवा पोलिस दलातील हवालदार दर्जाच्या व्यक्तीच्या हातून फाशीच्या शिक्षेची अमलबजावणी करता येईल.
हवालदार किंवा त्यापेक्षा कनिष्ठ पदावरील पोलिसाच्या हातून फाशीच्या शिक्षेची अमलबजावणी करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे . त्यामुळे कसाबला महाराष्ट्रातच फाशी देण्याचा निर्णय झाला तर त्याची अमलबाजावणी पोलिस दलातील कर्मचारी करू शकतो , अशी कायद्यात तरतूद आहे.
First Published: Thursday, August 30, 2012, 19:09