Last Updated: Saturday, May 18, 2013, 15:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर तुफान वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलीय. यामुळेच अपघातांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटलीय. यासाठी पोलिसांनी लढवलीय आयडीयाची कल्पना...
मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवर तुफान वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. वाहनं ८० किलोमीटर प्रति तास वेगापेक्षा जास्त वेगानं हाकलणाऱ्यांकडून दंड वसुली केली जातेय. यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवलीय. पोलीस ऊर्से आणि खालापूर टोल नाक्यावरील पावत्या वाहन चालकांकडून गोळा करतात. या पावत्यांवरील वेळेनुसार ज्या वाहनाला दोन टोल नाक्यांमधील ५२ किलोमिटरचं अंतर ४२ मिनिटांपेक्षा कमी वेळेत कापले असेल त्याच्याकडून दंड वसूल केला जातो. पोलिसांची ही आयडीची कल्पना कमालीची यशस्वी ठरलीय. वाहन चालकही दंड लावण्याच्या भीतीमुळं कमी वेगानं वाहनं हाकत आहेत. त्यामुळं अपघातांचं प्रमाणही घटलंय.
पोलिसांच्या या दंडवसूलीच्या नव्या पद्धतीचं काही वाहन चालकांनी स्वागत केलंय तर काही वाहन चालकांनी कारवाईसाठीचा ४२ मिनिटांचा वेळ ग्राह्य धरु नये, अशी मागणी केलीय.
सुसाट वेगानं वाहनं हाकणं हे एक्स्प्रेस वेवरील अपघातांचं प्रमुख कारण आहे. बेभान वाहनचालकांवर अशीच कारवाई करुन हायवेवरचा प्रवास अधिक सुरक्षित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 18, 2013, 15:43