Last Updated: Thursday, September 6, 2012, 18:50
www.24taas.com, मुंबईसूरक्षेत्र या कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असल्यावरून राज ठाकरे विरुद्ध चॅनल असं जे कुरूक्षेत्र रंगलं होतं. त्यांची अखेर कार्यक्रमाला परवानगी मिळण्यात झाली आहे.
`सूरक्षेत्र` या कार्यक्रमाला अखेर राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली मागणी बदलली. या कार्यक्रमाची सर्व निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने हा कार्यक्रम दाखवला जावा अशी निर्मात्यांची मागणी अखेर राज ठाकरेंनी मान्य केली. मात्र यापुढे अशा प्रकारचा कार्यक्रम केला तर मनसे त्याला विरोध करेल, असाही इशारा राज यांनी दिला.
`सूरक्षेत्र` हा कार्यक्रम कलर्स आणि सहारा या वाहिन्यांवरुन प्रक्षेपित केला जाणार आहे. या कार्यक्रमावरुन मनसेनं आधी निर्मात्यांना तसंच चॅनेल्सना धमकी दिली होती. कार्यक्रमाच्या परीक्षिका असलेल्या आशा भोसलेंनाही देशभक्तीचं आवाहन करत वाद ओढावून घेतला होता. मात्र इतके दिवस देशप्रेम, पाकिस्तानशी असणारे संबंध या विषयावर इतके आक्रमक झालेले राज ठाकरे निर्मात्यांशी झालेल्या एका भेटीतच शांत झाले यामुळे राज समर्थकांनी खेद व्यक्त केला आहे.
'अतिथी देवो भवः' की पैसा देवो भवः असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या राज ठाकरेंकडे मात्र चॅनलचे दोन अतिथी भेटीला आल्यावर ताबडतोब विचार बदलले. यामुळे बऱ्याच मुंबईकरांनी राज ठाकरेंनीही शेवटी 'पैसा देवो भवः'च केलं का असा संतप्त सवाल केला आहे.
First Published: Thursday, September 6, 2012, 13:40