राज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंचे समर्थन, Raj thackeray`s morcha

राज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंचे समर्थन

राज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंचे समर्थन
www.24taas.com,मुंबई

आम्ही शांततामय मार्गाने मंगळवारी मोर्चा काढणार आहोत. परंतु मोर्चा होऊ नये असे प्रयत्न केले जात आहेत. परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला. त्यानंतर सभेलाच परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शिवेसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष मनसेच्या मोर्च्याला समर्थन दिले आहे.

११ ऑगस्टला आझाद मैदानावर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मंगळवारी मनसेतर्फे गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान दरम्यान मोर्चा काढून आझाद मैदान येथे एका सभेचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी संपूर्ण राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणार आहेत.

लोकशाहीत मोर्चा काढणे हा अधिकार आहे आणि आम्ही शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढणार आहोत. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशीही फोनवरून चर्चा केली तेव्हा त्यांनी मोर्चा काढण्यास हरकत नसल्याचे सांगितले. आम्ही रीतसर परवानगीही आम्ही मागितली आहे, परंतु परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच, असेही राज यांनी स्पष्ट केले. हायकोर्टाने दिलेली नोटीस मी वाचली आहे. त्यात गिरगाव येथे गॅदरिंग (सभा) करण्यास मनाई असल्याचे म्हटले आहे. गॅदर (जमा) होण्यास नाही. आम्ही तेथे गॅदर होणार आणि आझाद मैदानाकडे कूच करणार असल्याचे राज म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी सर्व विरोधकांनी या विषयावर एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. ही बाब उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असता उद्धव म्हणाले, शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका आहे. ही भूमिका मान्य असेल तर आम्ही मनसेबरोबर जाण्यास तयार आहोत. मात्र, आमचे हिंदुत्व प्रासंगिक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

First Published: Tuesday, August 21, 2012, 09:25


comments powered by Disqus