काय झालं राज ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात?, Raj Thackeray vs Mla Harshavardhan Jadahv

काय झालं राज ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात?

काय झालं राज ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात?
www.24taas.com, मुंबई, दिनेश दुखंडे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट आरोप केला. आणि बंडाचं निशाणही फडकावले आहे. ‘झी २४ तास’शी बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी मनसेवर तोफ डागली आहे. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न - काय सांगाल तुमच्या नाराजीचं काय कारण आहे?

उत्तर - पक्षाने कार्यकर्त्याला सांभाळलं पाहिजे, मनसे सारखा नवा पक्ष काहीतरी वेगळं करेल, किंबहुना राज ठाकरे यांचा हा पक्ष असल्याने माझा सारखा एक तरूण या पक्षाकडे वळतो, राज ठाकरेंचा पक्ष काही तरी नवीन मार्ग दाखवेल. मात्र तसं काहीच न होता सुरवातीपासूनच कळलं की इथेही मिलीभगतच आहे. अगदी दरवेळेला विधानसभेच्या तिकीटापासून पाहिलं तर पैशाची देवाणघेवाण हा प्रकार दुर्दैवाने घडला. आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी मला मारहाण केली त्याच लोकांना पदं देण्याच काम मनसेने केलं. ते कसं केलं अर्थकारणाशिवाय दिलं का? तो माझा प्रश्न आहे.

माझं त्यांना तेच सांगणं होतं की, तुम्हांला जर इतर पक्षांना पाठिंबा द्यायचा होताच तर इथं असणाऱ्या साखर कारखान्याला मदत करा. त्यानंतर त्यांना पाठिंबा दिला गेला असता. तर त्याला काही तरी अर्थ राहिला असता. उगाचच काहीही न करता, ज्या पक्षाच्या लोकांनी आपल्याच आमदाराला बेदम मारलंय त्याच पक्षाला पाठिंबा देणं काही मला योग्य वाटत नव्हतं.

ज्यावेळेस विधानसभेत अधिवेशन झालं मला मारहाण झाल्यानंतर मार्च २०११ मध्ये. मारहाण झाली तेव्हा सभा नक्की झाली मात्र जेव्हा अधिवेशन सुरू झालं त्यावेळेस माझ्या मारहाणीबाबत कोणत्याही प्रकारचा निषेध मनसेकडून झाला नाही. पाच दिवस काहीच झालं नाही. आणि जेव्हा मी गटनेते बाळा नांदगावकर यांच्याकडे गेले तेव्हा तेही माझ्यावर चिडले. ‘तुझं काय सारखं सारखं लावलं आहे?’, म्हणजे मी मार खाऊन मीच सारखं सारखं काय लावलं आहे? माझा नाईलाज आहे हे असं जर पक्षाचं वागणं असेल तर काय करायचं?

प्रश्न - तुम्ही गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेपासून ते थेट तुम्हांला मारहाण केल्याच्या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाणाबाबत तुम्ही आरोप केल्या आहेत. त्यामुळे हे नक्की प्रकरण काय आहे?

उत्तर - राजकिय लोकं राजकिय तडजोडी करीत असतात, त्यापद्धतीने त्या तडजोडी झाल्या आहेत. त्या तडजोडी पक्षाकडून झाल्या आहेत. पक्षाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा निर्णय पक्ष प्रमुखांकडून हे निर्णय घेतले जातात. म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेसारख्या पक्षातही तरी पक्षप्रमुखच निर्णय घेत असतात. आर्थिक देवाण घेवाणाचा हा निर्णय ही पक्षाकडून घेतला जात असावा.

प्रश्न – तुम्ही एक विधान केलतं की, तुम्हांला पक्ष प्रमुखांकडून घाणेरडी भाषा वापरण्यात आली. काय नेमकं हे प्रकरण होतं?

उत्तर – नाही, गेले काही दिवसापासूनच सगळीकडे थोडी आग धुमसत होती, आमच्या पंचायत समितीला मनसेचे पाच लोक निवडून आले होते. तर प्रत्येकाला मनसेचं उपसभापती द्यावं असं ठरलं होतं. त्यापद्धतीने ज्याचे एक वर्ष झाला त्याला राजीनामा द्यावा असं सांगितल्यानंतर त्याने राजीनामा न देता वरपर्यंत गेला. मला वरून सांगण्यात आलं जो आहे त्यालाच ठेवण्यात आलं त्याला मी विरोध केला. म्हणजे तिकडे मुंबईत एअर कंडिशन ऑफीसमध्ये बसून इथे काय करायचं हे ठरवता येत नाही.

प्रश्न - यापुढचं तुमचं राजकीय पाऊल काय असणार आहे?

उत्तर - मी कोणत्याच पक्षाकडून निवडणुक लढवणार नाही. त्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. म्हणजे राज साहेबांच्या पक्षावर मला असा काहीतरी वाटायचा पण तोही असाच निघाल्याने मी माझ्या तालुक्याचा लोकांच्या भरवश्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. आणि ज्यापद्धतीने फोनवर संभाषण झालं ते अशोभनीय होतं. त्यामुळे आम्हांलाही स्वाभिमान आहे. आम्ही काय रस्त्यावर पडलेले लोकं नाही आहोत.... जरा गांभीर्याने जर बोलणं झालं असतं तर चाललं असतं मात्र तसं झालं नाहीय.

First Published: Wednesday, January 9, 2013, 13:50


comments powered by Disqus