Last Updated: Wednesday, December 5, 2012, 14:05
www.24taas.com, मुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी गेले अनेक वर्ष आंबेडकरी जनता ही लढत होती. आज त्या साऱ्याचं चीज झालं आहे. मात्र इंदू मिलमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रिपाई नेते रामदास आठवले यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यामुळे आता इंदू मिलचा ताबा हा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाल्याने रामदास आठवले आणि आंबेडकरी जनतेने राज ठाकरेंना `करून दाखवले` अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
उत्तरप्रदेशात पाकिस्तानी, बांगलादेशातील मुस्लिमांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेची विटंबना केली होती. लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला होता. ज्यावेळी उत्तर प्रदेशात बुद्ध मूर्ती तोडण्यात आल्या, त्यांची विटंबना झाली तेव्हा एकही बहुजनवादी नेता विरोध करायला का उभा राहिला नव्हता.
बुद्ध मूर्तींचं भंजन टीव्हीवर प्रत्येक वाहिनीवर दाखवण्यात आलं, तरी कुणी त्यावर प्रतिक्रिया का दिली नाही? बुद्ध मूर्ती तोडल्या गेल्या, तेव्हा कुठे होते मायावती, रा.सु. गवई, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर? असा खडा सवाल राज यांनी विचारला होता. या लोकांना फक्त ‘इंदू मिल, इंदू मिल’ एवढंच करता येतं, ही इंदू मिल घेऊन तुम्हाला काय बंगला बांधायचाय का? असं आपल्या खास शैली राज ठाकरे म्हणाले होते.
यालाच उत्तर म्हणून रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनाही चांगलेच खडे बोल सुनावले होते. मनसेला सध्या जेवढी मते मिळतात, तितकी मते महायुतीत आल्यावर त्यांना मिळणार नाही. तसंच इंदू मिलची जागा मागतोय कोहिनूर मिलची नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
नाशिकमध्ये दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतल्या जाहीर सभेत इंदू मिल आणि दलित नेत्यांसंदर्भात काढलेल्या उद्गाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
First Published: Wednesday, December 5, 2012, 13:40