राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढले, Ram Kadam cancel the protection

राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढले

राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढले
www.24taas.com,मुंबई

निलंबित आमदार राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना देण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस दलाने घेतला.

राम कदम यांच्या सुरक्षेसाठी चार पोलीस शिपाई तैनात करण्यात आले होते. पण आमदाराचे निलंबन झाल्यानंतर त्याची सुरक्षाव्यवस्था काढून घेतली जाते. त्यानुसार कदम यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेतली आहे. या प्रकरणातील अन्य एक आमदार जयकुमार रावल यांचीही पोलीस सुरक्षा काढून घेतल्याचे समजते.

एखाद्या आमदाराचे निलंबन करण्यात आल्यानंतर त्याची सुरक्षा काढून घेण्यात येते त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुसरे निलंबित आमदार क्षितिज ठाकूर यांना सुरुवातीपासूनच पोलीस सुरक्षा दिली नव्हती. वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये राम कदम यांच्यासह क्षिजित ठाकूर, राजन साळवी, प्रदीप जैयस्वाल आणि जयकुमार रावल यांचा समावेश आहे. या पाचही आमदारांना डिसेंबर २०१३ पर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन निर्णयाविरोधात सभागृहातील इतर आमदारांच्या भावना तीव्र असल्यामुळे सरकारने याप्रकरणी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीने पाचही आमदारांना सोमवारी चौकशीसाठी विधिमंडळात बोलावले आहे.

पोलीस सूर्यवंशी यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी विधानभवनात काही आमदारांनी मारहाण केली होती. सूर्यवंशी यांनी कदम आणि ठाकूर यांना ओळखले होते. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली होती.

First Published: Sunday, March 31, 2013, 08:50


comments powered by Disqus