भाडे नाकारलं तर याद राखा?, Rikrsha - taxi fare will not refuse to take

भाडे नाकारलं तर याद राखा?

भाडे नाकारलं तर याद राखा?
www.24taas.com,मुंबई

टॅक्सी आणि रिक्षावाल्यांची यापुढे भाडं नाकारलं अथवा प्रवाशांशी उद्धट वर्तन केलं तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. गैरवर्तन करणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित करून दंडात्मक कारवाई करणाचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

हकीम समितीच्या शिफारशींप्रमाणे भाडेवाढ मिळाल्यास, सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी शासन ठरवेल त्या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन टॅक्सी-रिक्षा संघटनांनी दिलं होतं. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी देतानाच, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टॅक्सी-रिक्षावाल्यांसाठी ` कसं वागायचं - कसं बोलायचं ` याबाबतची एक आचारसंहिताही जारी केलेय. ते हे आश्वासन पाळतात की नाही, याकडे परिवहन आयुक्त लक्ष ठेवणार आहेत.

उद्धट वर्तन करणाऱ्यांचा परवाना निलंबित होईलच. शिवाय प्रवाशांना मिळणा-या सेवेचा दर्जा सुधारला नाही, त्यांना चांगली सेवा मिळाली नाही आणि प्रवाशांची फसवणूक झाल्यास चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. टॅक्सी व रिक्षासाठी पूर्वी पहिला टप्पा १.६ कि.मी. चा होता. म्हणजेच किमान १.६ किमीसाठीचे भाडे द्यावे लागत होते आता पहिला टप्पा ही संकल्पना बंद करुन १ कि.मी. ते दीड कि.मी. यामधील अंतराचे (संबंधित जिल्ह्याचे प्राधिकरण ठरवेल त्यानुसार) किमान भाडे ठरविले जाणार आहे.

या आधी रिक्षासाठी २०० मीटर किंवा त्याचा भाग तर टॅक्सीसाठी १६७ मीटर किंवा त्याच्या भागासाठी एक टप्पा समजून भाडे आकारले जाई. आता ग्राहकांचे नुकसान टाळण्यासाठी भाड्याचा टप्पा १००मीटर ठरविण्यात आला आहे. प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी ऑटोरिक्षांबरोबर टॅक्सींमध्येही इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे आहे.

बनावट भाडेपत्रक वापरणे किंवा इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार अशा गुन्हयासाठी अधिक कडक कारवाई करताना परवाना रद्द केला जाणार आहे. रात्रीच्या वेळी २५ टक्क्याऐवजी ३० टक्के अधिक भाडे आकारण्याची शिफारस मान्य करण्यात आलेली नाही. प्रिपेड टॅक्सी-रिक्षा योजनेतील ४० ते ५० टक्के पर्यंत असलेले इन्सेंटिव्ह (जादा आकार) आता कमाल ३० टक्केपर्यंत , म्हणजेच कमी केले आहेत.

First Published: Saturday, October 6, 2012, 11:56


comments powered by Disqus