राम मंदीरावरून सेनेचा भाजपला टोला: ‘हिंदुत्ववाद’ उफाळला!, sanjay raut on bjp`s stand on ram madir

राम मंदीरावरून सेनेचा भाजपला टोला: ‘हिंदुत्ववाद’ उफाळला!

राम मंदीरावरून सेनेचा भाजपला टोला: ‘हिंदुत्ववाद’ उफाळला!
www.24taas.com, मुंबई

‘उशिरा का होईना राम मंदिर आठवलं’, असा टोला शिवसेनेनं भाजप आणि संघाला टोला लावलाय. ‘सत्ता असताना राम मंदिर का उभारलं नाही?’ असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेसाठी राम मंदिर हा राजकारणाचा नसून हिंदुत्वाचा मुद्दा आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

कुणाचंही नाव न घेता संजय राऊत यांनी राम मंदीराच्या मुद्द्यावरून जोरदार टोला हाणलाय. ‘अनेक वर्षांपासून हा मुद्दा बासणात पडून होता, सत्ता होती तरी राम मंदीर उभारू शकलो नाही, सत्तेसाठी वेळप्रसंगी तडजोडीही केल्या’ असं म्हणत संजय राऊत यांनी सरळसरळ भाजपवर शरसंधान साधलंय.

‘फक्त निवडणुकीसाठी हा मुद्दा पुन्हा आणला जात असेल आणि नंतर तो अडगळीत जाणार असेल नाहीतर निवडणुकांतून पळून जाणार असू तर देशातला हिंदू माफ करणार नाही. हिंदूंनी बंड केले तर देशात हिंदूत्ववाद राहणार नाही’ असं राऊत म्हणत आहेत.

यावेळीच शिवसैनिकांच्या भावनिक मुद्याला हात घालत बाळासाहेबांची आठवण राऊत यांनी करून दिलीय. ‘त्यामुळे पळून जाऊ नका, शिवसेना कधी पळून गेली नाही, राम मंदीरासाठी नासलेल्या विटा रचल्या जाणार असतील तर आनंदच आहे. अयोध्येच्या लढ्यात फक्त शिवसेना आक्रमक होती, तेव्हा फक्त बाळासाहेब लढवय्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले होते’ असं म्हणत शिवसेनेनं आपल्याच मित्रपक्षासमोर अनेक प्रश्नचिन्ह केलेत.

First Published: Thursday, February 7, 2013, 15:37


comments powered by Disqus