मातोश्रीसाठी... बुधवारची रात्र चिंतेची!, sequence at matoshree on wednesday

मातोश्रीसाठी... बुधवारची रात्र चिंतेची!

मातोश्रीसाठी... बुधवारची रात्र चिंतेची!
www.24taas.com, मुंबई

बुधवारी संध्याकाळपासून बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी पसरल्यावर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली. तसंच यामुळे मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली. याच घटनाक्रमावर एक नजर...

रात्री ८.३० रात्री आठच्या सुमारास शिवसेना नेते मनोहर जोशी तसंच शिवसेनेचे अन्य काही नेते मातोश्रीवर दाखल झाले.

रात्री ८.३० त्यानंतर काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही मातोश्रीवर पोहचले. त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृती विचारपूस केली. त्याचवेळी बाळासाहेबांची प्रकृती नाजूक असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

रात्री ९.०० शिवसैनिक मातोश्री जमा होऊ लागले. ही बातमी जसजशी पसरत गेली, तसतशी मातोश्रीवरची शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली.

रात्री ११.३० हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जमा झाले. त्याच वेळी अनेक ज्येष्ठ शिवसेना नेते तसंच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासारखे बाळासाहेबांचे निकटवर्ती मातोश्रीवर आले. शिवसैनिकांची गर्दी वाढत गेल्यामुळे मातोश्रीचं कलानगरच्या बाजुचं फाटक बंद करण्यात आलं. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे केले. कलानगरकडे येणारा मुख्य रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

रात्री १२.३० शिवसैनिकांची गर्दी वांद्रात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत पोहोचली होती. परिणामी महामार्गावरची वाहतुकही ठप्प झाली.

रात्री १.३० वाढत्या गर्दीमुळे परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. हा संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्वरित ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी काढले. बाहेर जमलेले शिवसैनिक शिवसेनाप्रमुख जिंदाबादच्या घोषणा देत होते.

रात्री १.३० राज ठाकरे शिवसैनिकांशी बोलण्याकरिता मातोश्रीच्या गेटवर आले. मात्र काही आवाहन न करताच ते परत गेले. दरम्यानच्या काळात रामदास कदम, लिलाधर डाके, सुर्यकांत महाडीक, एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते तसंच छगन भुजबळ, रामदास आठवले, संजय दत्त, मान्यता दत्त, बप्पी लहरी मातोश्रीवर आले.

रात्री २.०० उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मातोश्रीच्या गेटवर आले आणि बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं. `आपल्या आशिर्वादानं बाळासाहेब बरे होतील. आम्ही आशा अजून सोडलेली नाही,` असं उद्धव म्हणाले.

उद्धव यांच्या आवाहनानंतर शिवसैनिकांना धीर आला आणि गंभीर झालेला जमाव थोडाफार शांत झाला.

First Published: Thursday, November 15, 2012, 07:47


comments powered by Disqus