शरद पवारांची सोबत अ...ह... `असंगाशी संग नको`! Sharad Pawar not want to Mahayuti, Shiv sena tell his

शरद पवारांची सोबत अ...ह... `असंगाशी संग नको`!

शरद पवारांची सोबत अ...ह... `असंगाशी संग नको`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये स्थान नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. `असंगाशी संग नको` या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडलीय.

राज्यातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघा़डी सरकार देशातले सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. अशा तोंड काळं केलेल्यांना महायुतीत स्थान नसल्याचं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.

पाहूया काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात...

महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षांपासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आहे व देशातील अत्यंत भ्रष्ट व ढिसाळ सरकारांत त्यांची गणना होते. महिलांवरील अत्याचार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार व घोटाळ्यांची मालिका, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे महाराष्ट्राचे तोंड या लोकांनी काळे केले आहे. अशा महायुतीत घेऊन आम्ही मराठी जनतेच्या संतापाचे धनी होऊ इच्छित नाही. महाराष्ट्रातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीस कायमचे हद्दपार करून राज्याला वैभवाचे आणि सुखाचे दिवस दाखवू असे आम्ही वचन दिले आहे. शरद पवार व त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्राचे दुश्मन आहेत व दुश्मनांशी हातमिळवणी करून सत्तेची दलाली करण्याचे पातक आमच्या हातून होणार नाही. शिवसेना, भाजप, रिपाइं, शेतकरी संघटनेच्या महायुतीचा एल्गार महाराष्ट्रात भडकला आहे व भ्रष्ट कॉंग्रेस-राष्ट्रवादीची राखरांगोळी हाच आमचा निश्‍चय आहे. मोदी व पवार भेटले काय किंवा नाही भेटले काय, त्याचे आम्हास सोयरसुतक नाही. ही अफवाच आहे व अफवांच्या धोंड्यांना ठेच लागून महाराष्ट्र धडपडत नाही. युतीचे सरकार येताच सरकारातील अर्धे मंत्री जेलबंद होतील व उरलेले कायमचे घरी बसतील. सिंचन घोटाळ्यापासून टोल घोटाळ्यापर्यंत सगळ्याच फायली उघडल्या जातील. पोलिसी बेड्या कमी पडतील इतके गुन्हे या लोकांनी केले आहेत. हे लोक महाराष्ट्राचे दुश्मन व हिंदुत्वाचे मारेकरी आहेत. असंगाशी संग सगळ्यांनाच खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. गुप्त भेटी व गुप्त कारवायांवर आमचा विश्‍वास नाही. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला बांधील आहोत. समझनेवालों को इशारा काफी है!


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 1, 2014, 12:21


comments powered by Disqus