...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना, Shiv Sena support of the Prime Minister

...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना

...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना
www.24taas.com,मुंबई

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे मोदींना सेनेचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी सुषमा स्वराज यांना पंतप्रधानपदासाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता. ही बाब उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना अधोरेखेतीत केलीय. उद्धव यांच्या हस्ते मातोश्रीवर एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी त्यांनी मोदींविषयची बाब स्पष्ट केली.

भाजपकडून अधिकृतरित्या पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे स्पष्ट होणार नाही. भाजपने आधी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उद्धव यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उद्धव यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर पवार गप्प का, याचेच आश्चर्य वाटत आहे. अजित पवार यांच्या माफीने हा विषय संपणार नाही. या विषयावर मुख्यमंत्रीही गप्प आहेत. या सरकारला केवळ सिंचनाच्या टेंडरच्या टक्केवारीत रस आहे, अशी टीका उद्धव यांनी केली.

First Published: Thursday, April 11, 2013, 16:10


comments powered by Disqus