शिवसेना-भाजपमधील दरी रुंदावतेय, Shiv sena vs BJP

शिवसेना-भाजपमधील दरी रुंदावतेय

शिवसेना-भाजपमधील दरी रुंदावतेय
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं दोन उमेदवार उभे केल्यानं भाजपामध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेना-भाजपा युतीचं विधानसभेतलं संख्याबळ पाहता तीन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र शिवसेनेनं आधीच निलम गोऱ्हे आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. तर भाजपही दोन उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेचे मित्र असलेल्या रामदास आठवलेंसाठी भाजपानं राज्यसभेची जागा सोडली. याचा विचार करून शिवसेनेनं एकच उमेदवार उभा करायला हवा होता, असं भाजपामधील नेत्यांच मत झालंय. २० मार्च रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलंय. विधान परिषदेची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर सोपवलीय. त्यामुळं विधान परिषदेच्या निवडणूकांशिवाय दुस-या कोणत्याही विषयावर या बैठकीत चर्चा झाली नसल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलंय.

काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीगाठीमुळं तावडे राज भेटीबाबत राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र खुद्द तावडेंनी याबाबत भूमिका स्पष्ट केलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 8, 2014, 12:25


comments powered by Disqus