Last Updated: Tuesday, December 25, 2012, 18:28
www.24taas.com, मुंबईमहापुरुषांच्या दुर्मिळ ठेवा आणि त्याचा वाद हे जणू आता समीकरण बनलंय. काही दिवसांपूर्वी सापडलेल्या एका ध्वनीमुद्रिकेतला आवाज लोकमान्य टिळकांचा नाही असं समोर आलं असताना आता शिवरायांच्या पत्राचा वाद उफाळून आलाय.
या इतिहास संशोधकांचा हा दावा खोटा असल्याचा प्रतिदावा आता होतोय. हा प्रतिदावा केलाय दुस-या एका इतिहास संशोधकानं. स्त्रियांशी गैरवर्तन करणा-या रांजे गावच्या पाटलाचे हात-पाय तोडण्याची शिक्षा शिवरायांनी दिली होती. याची माहिती या पत्रात होती. शिवाय हे पत्र आतापर्यंत सर्वात जुने पत्र असल्याचा दावा अनुराधा कुलकर्णी आणि अजित पटवर्धन यांनी केला होता. मात्र त्यांचा हा दावा अनंत दारवटकर या इतिहास संशोधकानं खोडून काढलाय.
महाराजांच्या पत्रात हात तोडण्याचा उल्लेख आहे.. मात्र पाटलाचे हात तोडावेत असं कुठंही म्हणण्यात आलं नाही, असा दावा त्यांनी केलाय. शिवाय हे पत्र इतिहास संशोधक मंडळाच्या दप्तरात उपलब्ध होते. त्यामुळं नव्याने ते सापडल्याचा दावाही त्यांनी पुसून काढलाय.
भारत इतिहास संशोधक मंडळानेच १९३० साली प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील याच पत्राचा दारवटकर यांनी दाखला दिलाय. १९३० साली हेच पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाने पुस्तकात प्रसिद्ध केले. त्यात पाटलाचा उल्लेख नाही. मग, आता पुन्हा तेच पत्र सापडल्यावर त्यात पाटलाचा उल्लेख कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
या पत्रात पाटलाचा उल्लेख असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान त्यांनी दिलंय. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पत्राला आता वेगळंच रंग चढू लागलेत.
First Published: Tuesday, December 25, 2012, 18:28