Last Updated: Thursday, November 15, 2012, 20:18
www.24taas.com, मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती आता स्थिर असल्याची बातमी सांगताना शिवसेना नेते सुभाष देसाईंनी शिवसैनिकांच्या प्रर्थनेला यश आल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती सुधारावी, यासाठी शिवसैनिकांनी होम हवन, यज्ञ यागांचाही मार्ग स्वीकारला. तसंच मुंबईमधील सिद्धिविनायकाच्या चरणी शिवसैनिकांची गर्दी जमली होती.
सिद्धिविनायक हे मुंबईकरांचं श्रद्धास्थान तर बाळासाहेब हे शिवससैनिकांचं श्रद्धास्थान. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती गंभीर असल्याचं कळताच शिवसैनिकांनी सिद्धिविनायकाकडे बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी साकडं घातलं. “बाप्पा, आमच्या साहेबांना लवकरात लवकर बरं कर” अशी प्रार्थना शिवसैनिकांनी केली आहे.
काल रात्रीपासून शिवसैनिकांनी सिद्धइविनायकाच्या दारी गर्दी केली होती. गिरगांवपासून ते गिरणगावापर्यंतच्या सर्व मराठी वस्त्यांमधील शिवसैनिक सिद्धिविनायकाकडे बाळासाहेबांच्या प्रकृती स्वस्थ्यासाठी प्रार्थना करत होते. सिद्धिविनायक हे मुंबईतील जागृत देवस्थान असल्याचं मानलं जातं. त्यामुळे सिद्धिविनायक नक्की आपल्या ‘साहेबां’ना बरं करेल, असा शिवसैनिकांना विश्वास आहे. याशिवाय मुंबईतल्या इतर अनेक मंदिरांमध्ये शिवसेना कार्यकर्ते जमा होऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी साकडं घालताना दिसत आहेत.
First Published: Thursday, November 15, 2012, 19:43