Last Updated: Thursday, October 18, 2012, 19:09
दिनेश दुखंडे, www.24taas.com, मुंबईभाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर याचा ‘बोलविता धनी कोण ?’ याची चर्चा आता सुरु झाली आहे. गडकरींचा वारू रोखण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा संशय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.
अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरच तोफ डागली आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांसह खुद्द गडकरींना या आरोपांना उत्तर द्यावं लागलं. केजरीवाल यांनी दमानियांनी दिलेली कागदपत्रं आणि माहितीच्या आधारे हे आरोप केले असले तरी त्यामागे नेमका कुणाचा हात आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. भाजपनं पक्षाच्या घटनेत बदल करून गडकरींचा दुसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा केला असताना त्यांना रोखण्यासाठीच हे षडयंत्र तर नाही ना अशी शंका वर्तवून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला खमंग फोडणी दिली....
गडकरी विरोधातल्या आरोपांना भाजपमधल्या अंतर्गत राजकीय संघर्षाची किनार आहे का हा मुद्दाही या निमित्तानं पुढे आलाय. अर्थात भाजप नेते मात्र ही शक्यता फेटाळून लावतायत.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपातल्या संघर्षाची चर्चा नेहमीच होत असते.... गडकरींनी कितीही खुलासे केले तरी त्यांचं नावही या स्पर्धेत घेतलं जातं.... त्यात आता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं जावं अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार राम जेठमलानी यांनी गडकरींना पत्र लिहून केलीय.... काळ्या पैशांच्या मुद्यावर भाजप आक्रमक भूमिका घेत नसल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवलाय.... या पार्श्वभूमीवर गडकरींवरील आरोप विरोधी पक्षातून की पक्षांतर्गत संघर्षातून या चर्चेला अर्थातच रंग चढलाय.
First Published: Thursday, October 18, 2012, 19:09