शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना दिलं अभय Uddhav Thackeray provided safe for Narvekar

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना दिलं अभय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना दिलं अभय
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांच्या आरोपानंतरही मिलिंद नार्वेकर यांचं मातोश्रीवरचं प्रस्थ कायम आहे. रावलेंचा विषय संपला, असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना अभय दिल्याचं स्पष्ट झालंय.

अरे... हे तर आपले मिलिंद नार्वेकर महाशय... मंगळवारी सक्काळी सक्काळी ही स्वारी कुणीकडं गेली होती बरं???... ओहो... हा तर वांद्र्यातला रामदास आठवलेंचा बंगला... नार्वेकर महाशय इकडे काय करताहेत बरं, बहुधा महायुतीचं काही काम घेऊन ते आठवलेंना भेटायला आले असावेत!!... काल एवढ्या मोठ्या वादाला सामोरं गेल्यानंतर, दिसतोय का त्यांच्या चेहऱ्यावर काही ताण, तणाव? बहुदा हीच ती मिलिंद नार्वेकर यांची खासियत असावी...

मोहन रावलेंचे आरोप, त्यामुळं उद्भवलेल्या वादानंतरही मिलिंदसाठी आजचा दिवस तसा नॉर्मलच होता... सकाळी नियमितपणे तो "मातोश्री" वर आला आणि त्यांनं स्वतःला दैनंदिन कामाला वाहून घेतलं... कार्यक्रम होता एका दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा... प्रकाशन होणार होतं उद्धव ठाकरेंच्या हस्ते... पक्षप्रमुख "मातोश्री"च्या तळमजल्यावरच्या हॉलमध्ये आले... एरव्ही त्यांच्यासोबत सावलीसारखा वावरणारा, चित्रवाहिनींच्या कॅमेरा फ्रेममध्ये आपण असू याची विशेष काळजी घेणारा मिलिंद कालच्या प्रकरणामुळं जरा उद्धव ठाकरेंपासून अंतर ठेवूनच होता... पण स्वस्थ बसेल तो मिलिंद कसला... दूरूनही त्याची सुरु असलेली चुळबूळ, खाणाखुणा नजरेत भरेल इतकी स्पष्ट होती...

कालचा वाद मिलिंदसाठी तसा नवा नव्हता... याआधी भास्कर जाधव, नारायण राणे, राज ठाकरे, प्रदिप जयस्वाल यांनीही मिलिंदच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली होती. पण त्यानं मिलिंदला काहीच फरक पडला नाही, उलट प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेच अस्वस्थ झाल्याचं जाणवलं... यावेळीही कदाचित ते मनातून अस्वस्थच असावेत... कारण आपल्यापेक्षा अधिक प्रसिद्धी पीएला मिळावी हे कुठच्या पक्षप्रमुखाला रुचेल?

बाळासाहेब ठाकरेंचेही अनेक पीए झाले... सुरुवातीच्या काळात मेघश्याम वरळीकर, मोरेश्वर राजे, चंद्रमणी ते अगदी आताच्या रवी म्हात्रे यांच्यापर्यंत... पण त्यांना इतकं प्रसिद्धीचं वलंय कधीच लाभलं नाही, किंवा बाळासाहेबांनीच तसं होऊ दिलं नाही...

परंतु आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शाखाप्रमुखांची नियुक्ती असो नाहीतर उपविभागप्रमुखांची, अनेक छोटेमोठे निर्णय पीए मिलिंद नार्वेकरच घेतात, हे आता लपून राहिलेलं नाही. विभागप्रमुखांना विश्वासात न घेताच, आर्थिक उलाढालींतून अनेक नियुक्त्या परस्पर केल्या जातात, अशी चर्चाही दबक्या आवाजात आहे. शिवसेनेत कोणतंही पद नसताना, मिलिंदचा एवढा रूबाब आहे... तर उद्या एखादं पद मिळालं तर मिलिंदचा तोरा काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी....



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 22:45


comments powered by Disqus