`टल्ली व्हा... बाटल्या फोडा`, smash the bottle, so that you don`t drink daaru desi

`टल्ली व्हा... बाटल्या फोडा`

`टल्ली व्हा... बाटल्या फोडा`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दारुच्या बाटल्या रिचवत असाल तर बाटल्या रिकाम्या झाल्यानंतर ताबडतोब या बाटल्या फोडून टाका... आणि स्वत:चा जीव वाचवा, असा सल्ला आता उत्पादन शुल्क विभागानं ग्राहकांना दिलाय.

रिकाम्या झालेल्या बाटल्या गोळा करून त्यांतून बनावट दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर येतंय. या बनावट दारुमुळे ग्राहकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा बाटल्यांवर आणि बनावट दारूवर नियंत्रण मिळवणं सरकारसाठी चिंतेचीच बाब आहे. त्यामुळे, तुम्हीतरी स्वत:चा जीव वाचवावा, यासाठी उत्पादन शुल्क विभागानं ही नवीन मोहीम आखलीय.

इम्पोर्टेड आणि देशातली महागड्या बाटल्यांतील दारू रिचवल्यानंतर बाटली फेकून न देता फोडून टाका असा सल्ला देण्यासाठी ‘रिकामी बाटली फोडा’ असं आवाहन करण्यात येतंय. शिवाय रिकाम्या बाटल्यांवरची लेबल्सही ताबडतोब नष्ट करा. पंचतारांकीत हॉटेल्स, परमीट रूम, क्लब, बार आणि रिटेल दुकानांमधील रिकाम्या झालेल्या सर्व दारूच्या बाटल्या दुकानदारांनाही रिकाम्या झालेल्या बाटल्या ताबडतोब फोडून टाकाव्या लागणार आहेत. रिकाम्या बाटल्या आढळून आल्यास संबंधित हॉटेल्स आणि बार मालकांवर कारवाई करण्यात येईल.

स्कॉच, विस्की आणि टकिला या इम्पोर्टेड दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा पुन्हा वापर करून बनावट दारू विकली जात आहे. दारू अस्सल वाटण्यासाठी बनावट दारूचे विक्रेते जुन्या बाटल्यांची कॅप पुन्हा-पुन्हा वापरत आहेत आणि ही बनावट दारू ते बाजारभावाने विकत असल्याने राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. इम्पोर्टेड आणि महागड्या दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडण्यासाठी महिन्यातून दोन वेळा हॉटेल्स, बार आणि परमीट रूम्सला भेट देण्याविषयी अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्यात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 10:13


comments powered by Disqus