Last Updated: Wednesday, May 23, 2012, 17:12
www.24taas.com, गोवा गोव्यातील ‘केपे’ या ठिकाणी तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या झाल्याचं समोर आलंय. मुळची मुंबईची असलेली सीमा खान गोव्यात सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे आली असताना ही घटना घडलीये. बलात्कार करून बालिकेची हत्या झाली? की ही मुलगी करणीचा बळी ठरलीय? असा प्रश्नाची उकल आता पोलिसा करत आहेत.
मुंबईस्थित रेहमत खान यांची तीन वर्षांची मुलगी सीमा सुट्टीमध्ये केपे इथं आपल्या नातेवाईकांकडे आली होती. गेल्या महिनाभर ती इथं राहत होती. 20 मे रोजी दुपारी अंगणात खेळत असताना सीमा अचानक गायब झाली. शोधाशोध सुरु असताना मंगळवारी संध्याकाळी तिचा मृतदेह आढळला. सीमा राहत असलेल्या घरापासून 500 मीटर अंतरावर एका बिल्डींगच्या तळघरात हा मृतदेह आढळला. एका प्लास्टिकच्या पिशवीत शिर नसलेला विवस्त्र अवस्थेत हा मृतदेह होता.
केपे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. मृतदेहावरील जखमांच्या खुणांवरुन हा बलात्कार आणि हत्येचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होतेय. तर दुसरीकडे हा करणीचा तर प्रकार नाही ना? असाही संशय व्यक्त होतोय. आरोपींना तातडीनं पकडण्याचं आव्हान गोवा पोलिसांसमोर आहे.
First Published: Wednesday, May 23, 2012, 17:12