जयवंत परब यांचे अंधेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन - Marathi News 24taas.com

जयवंत परब यांचे अंधेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन


झी २४ तास वेब टीम, मुंबई


नारायण राणेंची साथ सोडणाऱ्या जयवंत परब यांनी अंधेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. अंधेरीतील सभेला उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. नारायण राणेंची साथ सोडून स्वगृही शिवसेनेत परतलेल्या जयवंत परबांनी राणेंवर घणाघाती हल्ला चढवला.

आपल्या मुलाला महापालिकेचे निवडणुकीचे तिकिट पाहिजे म्हणून मी सेनेत परतलो या राणेंच्या वक्तव्याचा परबांनी चांगलाच समाचार घेतला. माझा मुलगा, मुलगी आणि बायको अमेरिकन नागरिक आहेत ते कशाला निवडणुकीचे तिकिट मागतील असा सवाल परबांनी केला. नारायण राणेंची बायको अमेरिकेत ८६ साली गेली होती तेंव्हा आपल्या बायकोनेच त्यांना अमेरिका दाखवली होती असं परबांनी भाषणात सांगितलं.

नारायण राणेंच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सेना सोडली त्याबद्दल परबांनी पश्चाताप व्यक्त केला. मी आणि श्रीकांत सरमळकर यांनी नारायण राणेंची साथ दिली नसती तर त्यांना मुंबईत फिरणं मुश्किल झालं असतं याची आठवणही परबांनी करुन दिली. नारायण राणेंच्या मुलाचा शेंबड्या म्हणून समाचारही परबांनी घेतला.

 
उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि अजित पवारांवर कडाकडून टीकास्त्र सोडलं. नारायण राणे किती लाचारी करणार असा खडा सवालच उद्धव ठाकरेंनी केला. स्वाभिमान असेल तर विदेशी बाईचे बूट चाटू नका असं राणेंना उद्धव ठाकरेंनी सूनावलं. काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना हजारभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं नमुद करतानाच टगेगिरी न करता शेतकऱ्यांना न्याय द्या असा हल्ला उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर चढवला.  महापालिकेच्या निवडणुकीत होणाऱ्या घमासानीची ही केवळ चुणूक आहे असंच म्हणावं लागेल.
 
 
 

First Published: Sunday, December 4, 2011, 16:31


comments powered by Disqus