मनसे झाली लेखी परीक्षा, आता निकालाची प्रतिक्षा! - Marathi News 24taas.com

मनसे झाली लेखी परीक्षा, आता निकालाची प्रतिक्षा!

झी २४ तास वेब टीम, मुंबई  
आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे इच्छुकांची आज परीक्षा झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड अशा सहा शहरांमध्ये ही परीक्षा झाली. एकून 3156 इच्छुकांनी ही परीक्षा दिली.
 
ही परिक्षा पास झाल्यानंतरच मनसेची महापालिकांसाठी उमेदवारी मिळणार आहे. सकाळी ११ ते दुपारी साडेबारा अशी दीड तास ही परीक्षा झाली. १०० मार्काच्या या परीक्षेलाठी एकूण ५२ प्रश्न विचारण्यात आले होते. पहिल्या ५० प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण आणि ५१ आणि ५२ व्या प्रश्नाच्या उत्तराला अ,ब आणि क श्रेणी दिली जाणार आहे. या दोन प्रश्नांमध्ये मनसे प्रमुखांविषयी माहिती विचारण्यात आली होती. तर नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासासाठी काय कराल असा दुसरा प्रश्न होता.
 
इतर प्रश्नांमध्ये राज्यात महापालिका किती आहेत तालुके किती असे प्रश्न प्राधान्यानं होते. परीक्षेसाठी मुंबईत १२०८, ठाण्यात ३९७, नाशिकला ६४८, पुणे ६११, पिंपरी चिंचवड १८८ तर नागपूरला १०४ असे एकूण ३१५६ इच्छुकांनी परीक्षा दिली. आता इच्छुकांना निकालाची प्रतीक्षा आहे.
 
या आधारेच उमेदवारी दिली जाणार आहे. ज्या इच्छुकांना काही महत्त्वाच्या कारणांनी आज परीक्षा देता आली नाही त्यांची कारणे पाहून पुन्हा परीक्षा देता येईल. त्यांच्यासाठी दुसरा पेपर असेल.
 
पुण्यात ८५० इच्छुकांनी ही परीक्षा दिली. निवडणुकीच्या उमेदवारीसाठी परीक्षा देण्याची उमेदवारांची पहिलीच वेळ होती. त्यामुळं सर्वच उमेदवारांच्या चेह-यावर तणाव स्पष्टपणं दिसत होता. विशेष म्हणजे सर्वच परीक्षा केंद्रांवर बाऊंसर तैनात करण्यात आले होते. तर मनसेच्या काही नेत्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षार्थी आणि सुपरविजन करणारे पदाधिकारी यांच्याशिवाय परीक्षा केंद्रात कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता.
 
 

First Published: Sunday, December 4, 2011, 15:35


comments powered by Disqus