पावसाची साद, MMRDAचा वाद - Marathi News 24taas.com

पावसाची साद, MMRDAचा वाद

अमित जोशी, www.24taas.com, मुंबई
 
एमएमआरडीए आणि पावसाळ्यातील वाद हे समीकरण नित्याचे झालंय. मेट्रो आणि मोनो रेल्वेचं काम सुरू असलेल्या मार्गातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे त्रास होणार असल्याची तक्रार नागरिक पावसाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच करायला लागले आहेत. तर पावसाळा सुरू होण्याआधी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण होतील असा दावा एमएमआरडीनं केलाय.
 
अंधेरी पश्चिमेला नवरंग सिनेमाजवळ जे. पी मार्गावर मेट्रो रेल्वेचं काम गेली तीन वर्षे सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी कामाच्या ठिकाणी झालेला कचरा, खड्डे कायम असल्याची नागरिकांची, दुकानदारांची तक्रार आहे. मेट्रोच्या कामामुळे गटाराचा मार्गही बुजवला गेलाय. तेव्हा गेल्या वर्षाप्रमाणे यावेळीही या मार्गावर हमखास पाणी साचणार असल्याची भीती दुकानदारांनी व्यक्त केली आहे.
मेट्रो, मोनो आणि इस्टर्न फ्री वे मार्गावर कामांमुळे तयार झालेला सर्व कचरा पावसाळ्यापूर्वी उचलला जाणार असल्याचं एमएमआरडीएनं स्पष्ट केलंय. कामाच्या ठिकाणी बॅरिकेटस् लावले जात आहेत. विविध ठिकाणी अद्ययावत कंट्रोल रुम सज्ज ठेवली गेली असल्याचंही एमएमआरडीएनं सांगितलंय.
 
एमएमआरडीएच्या ताब्यात सहा किमी लांबीचा मिठी नदीचा मार्ग आहे. इथला गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरुए. पावसाळ्यापूर्वीच एमएमआरडीए सज्ज होत असल्याचं अधिका-यांनी सांगितलं. एमएमआरडीचं हे दावे किती खरे ठरतात हे आता पावसाळ्यातच स्पष्ट होईल.

First Published: Monday, June 4, 2012, 14:25


comments powered by Disqus