नरेंद्र मोदींची स्व. इंदिरा गांधींवर टीका - Marathi News 24taas.com

नरेंद्र मोदींची स्व. इंदिरा गांधींवर टीका

www.24taas.com, मुंबई
 
गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या टीकेने पुन्हा नवा वाद उसळला आहे. एका भाषणात नरेंद्र मोदी यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्न उपस्थित केला होता. आधीच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या टीकेचे धनी बनलेल्या मोदींनी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा टीका ओढावून घेतली आहे.
 
मोदी यांनी मुंबईमधल्या एका पुरस्कार सोहळ्यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक घटना सांगितली. ‘पूर्वोत्तर राज्यांमध्ये जर आम्ही निवडणूक जिंकलो, तर काँग्रेस बायबलमध्ये दिलेल्या नियमांनुसार प्रशासन चालवेल, असं इंदिरा गांधींनी अश्वासन दिलं होतं. मात्र, कुठल्याही धर्मनिरपेक्षतावादी व्यक्तीने या वक्तव्यावर आक्षेप घेतला नव्हता. आजही हा भाग मागासलेला असण्याचं कारण इंदिरा गांधींची ही नीतीच जबाबदार आसल्याचं मोदी म्हणाले.
 
“पूर्वोत्तर राज्यं जाणून बुजून  काँग्रेसने उपेक्षित ठेवली. तिथल्या लोकांचा विकासच होऊ दिला नाही. तेथी लोकांनीही देशासाठी बलिदान दिले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आसामचं प्रतिनिधीत्व करत असूनही या जनतेला न्याय देऊ शकले नाहीत.” असं म्हणत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याववरही मोदींनी टीका केली.
 
काँग्रेसने मात्र मोदींच्या या आरोपांना दुर्दैवी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राशिद आल्वी म्हणाले, “इंदिराजी काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षांमध्येही लोकप्रिय होत्या. अशा नेत्यांवर आरोप करणं दुर्दैवी आहे.”

First Published: Wednesday, June 6, 2012, 08:35


comments powered by Disqus