Last Updated: Tuesday, June 12, 2012, 12:34
www.24taas.com, कल्याण पावसाळा तोंडावर आला असल्याने कल्याण डोंबिवलीतील शहरातील नालेसफाईची आणि गटार सफाईची कामे सुरु असून या कामासाठी ठेकेदाराने चक्क बालकामगारांना कामाला लावल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. ‘झी 24 तास’नंही कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता अतिशय बेजबाबदार अशी उत्तरं त्यांनी दिली आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'ब' प्रभाग क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ‘चिकनघर’मधील जयभीम नगर परिसरात महापालिकेतर्फे नालेसफाईची आणि गटारांची साफसफाई कामे सुरु आहेत. ही कामे करताना एकाच ठिकाणी १४ वर्षाखालील ३ ते ४ मुले गटारसफाई करीत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी याबाबत पत्रकारांना कळविले. पत्रकारांनी घटनेची शहानिशा केली. याबाबत ‘झी 24 तास’नं कल्याणचे सहाय्यक कामगार आयुक्त अशोक चिवटेंना विचारलं असता त्यांनी आपली जबाबदारी तर झटकलीच मात्र, बेजबाबदार अशी वक्तव्यंही त्यांनी यावेळी केली. तसंच कारवाई कधीपर्यंत होणार, यावरही माहित नाही असं वक्तव्य चिवटे यांनी केलंय.
या प्रकारामुळे ज्या यंत्रणांनी बालमजुरी विरोधात जनजागृती करणे अपेक्षित आहे, ते महापालिका प्रशासनच एकप्रकारे बाल कामगार प्रथेला पाठबळ देत असल्याचं दिसून येतंय.
.
First Published: Tuesday, June 12, 2012, 12:34