महावितरणचा ग्राहकांना शॉक - Marathi News 24taas.com

महावितरणचा ग्राहकांना शॉक

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.
 
एप्रिल २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत वीजखरेदीसाठी आलेल्या वाढीव खर्चापोटी थकलेले १४८३ कोटी रुपये इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून राज्यातील वीजग्राहकांकडून वसूल करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सामान्य घरगुती वीजग्राहकांवर वीजवापराच्या गटानुसार प्रति युनिट २२ ते ६८ पैशांचा बोजा पडणार आहे.
 
ही वसुली जून ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये सहा समान हप्त्यांमध्ये करण्याची अनुमती महावितरणला दिली आहे. यानुसार महिन्याला २४७ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. ही दरवाढ घरगुती ग्राहक, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्वच स्तरातील ग्राहकांच्या खिशातून होणार आहे.
 
राज्यात आजच्या घडीला ८५ टक्के वीज निर्मिती ही कोळशावर आधारित आहे. आपण ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया यांसह आणखी काही प्रमुख देशांतून कोळसा आयात करतो. मात्र, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया या देशांनी त्यांच्या कररचनेत केलेल्या बदलामुळे आयातीचा दर वाढला आहे.

First Published: Tuesday, June 19, 2012, 10:07


comments powered by Disqus