केईएमचे अधिष्ठा डॉ. ओक यांचा राजीनामा - Marathi News 24taas.com

केईएमचे अधिष्ठा डॉ. ओक यांचा राजीनामा

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई पालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी एमआरआय मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, हा निर्णय राजकीय नेत्यांनी बदला. खरेदी करण्यात आलेल्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी  शिवसेना, मनसे आणि सपाच्या नगरसेवकांनी  केल्यामुळे व्यथित झालेले केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाते आणि पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. संजय ओक यांनी अधिष्ठाता तसेच संचालक  पदाचा राजीनामा  दिला आहे. याबाबतचे राजीनामा पत्र पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवून दिले आहे.
 
कोणताही वाद निर्माण न करता पत्नी कर्करोगाने आजारी असल्याने आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती करून डॉ. ओक यांनी राजीनामा दिला आहे. ज्या परिस्थितीत डॉ. ओक यांनी राजीनामा दिला त्यामुळे केईएममधील डॉक्टर कमालीचे संतप्त झाले असून त्यांनी हा राजीनामा स्वीकारू नये, असे पत्रच आयुक्त कुंटे यांना दिले आहे.
 
महापालिका रुग्णालये अद्ययावत व्हावी व येथे येणाऱ्या गरीब रुग्णांना सर्वोत्तम सेवा मिळावी या भूमिकेतून जागतिक निविदा मागवून एमआरआय मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मशिनची किंमत आठ कोटी रुपये असून त्यात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र स्थायी समितीत सपाच्या नगरसेवकाने फिलिप्स कंपनीचे हे मशिन चार कोटी रुपयांना मिळते, असा आरोप करून चौकशीची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती.
 
माझा पक्ष अन्य पक्षांपेक्षा वेगळा असेल, अशी घोषणा करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. साधा दूरध्वनी करूनही डॉ. ओक यांच्याकडून वस्तुस्थिती समजून घेता आली असती. मात्र समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांच्या सुरात सुर मिळवून साऱ्याच पक्षांनी चौकशीची मागणी केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. ओक यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
 
शिवसेनेच्या स्थायी समिती अध्यक्षाने कोणतीही माहिती न घेता थेट चौकशीची मागणी आयुक्तांकडे केल्यामुळे डॉ. ओकच नव्हे तर केईएममधील डॉक्टरही कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. आपल्या राजीनामा पत्रात पत्नी कर्करोगाने आजारी असल्यामुळे आपल्याला अधिष्ठाता व संचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे डॉ. ओक यांनी नमूद केले आहे.
 
दरम्यान, गरीब रुग्णांसाठी सर्वोत्तम उपकरण घेण्याच्या निर्णयाचा स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांना एवढा का त्रास झाला, एका ‘रईसजाद्या’साठी स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी थेट आयुक्तांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करण्यामागे कोणते ‘अंडर स्टँडिंग’ आहे असे संतप्त सवाल केईएममधील डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
 
केईएममध्ये आज बंद
एमआरआय मशिनच्या खरेदीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर केईएमचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांनी दिलेल्या राजीनाम्याचे केईएम रुग्णालयात ताबडतोब पडसाद उमटले.
 
ओक यांच्या राजीनाम्याचे वृत्त समजताच संतप्त झालेल्या डॉक्टरांनी आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. केईएम रुग्णालयात परिचारिका व डॉक्टर मोर्चा काढणार असून डॉ. ओक यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी त्यांची मागणी आहे.  तर म्युनिसिपल कामगार सेनेने बुधवारी केईएम बंद करण्याची घोषणा केली आहे.
 
व्हिडिओ पाहा...

First Published: Wednesday, June 20, 2012, 09:57


comments powered by Disqus