सुप्रिया सुळे अडचणीत दुहेरी नागरिकत्वामुळे! - Marathi News 24taas.com

सुप्रिया सुळे अडचणीत दुहेरी नागरिकत्वामुळे!

झी २४ तास वेब टीम, मुंबई
दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या नागरिकत्वाबाबत आक्षेप घेत अपक्ष उमेदवारानं याचिका दाखल केली आहे.
 
ही याचिका रद्दबातल ठरवावी ही सुळेंची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली. त्यामुळं हा खटला सुरुच राहील. सुप्रिया सुळेंकडे सिंगापूरचे नागरिकत्व आहे. त्यामुळं त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवावं अशा आशयाची ही याचिका कोर्टात करण्यात आली आहे. ही याचिका कोर्टानं रद्द करण्यास नकार दिल्यानं सुप्रिया सुळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
 
२००९मध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवार मृणालिनी काकडे यांनी सुप्रिया सुळेंचं भारतीय नागरिकत्व रद्द केलं जावं, अशी मागणी करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.
 
काकडे यांनी सुप्रिया सुळे या सिंगापूरच्याही नागरिक असल्याचं म्हटलं होतं. कारण सुप्रिया सुळे यांची सिंगापूरमध्ये मालमत्ता आहे त्याचप्रमाणे त्या सिंगापूरच्या एका खासगी कंपनीत भागीदारही आहेत. आणि सिंगापूरच्या कायद्यानुसार नागरिकत्वाशिवाय कोणालाही तिथे प्रॉपर्टी खरेदी करता येत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्वासंबंधी काकडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ चा दाखला देत काकडे यांनी जुलै २०१० मध्ये काकडे यांनी ही याचिका दाखल केली होती.

First Published: Friday, December 9, 2011, 17:16


comments powered by Disqus