विलासरावांनी फोडले अशोक चव्हाणांवर खापर! - Marathi News 24taas.com

विलासरावांनी फोडले अशोक चव्हाणांवर खापर!

www.24taas.com, मुंबई
वादग्रस्त 'आदर्श'च्या इमारतीसाठी जमीन देण्याचा आदेशाच्या फाईल्स मुख्य सचिवांनीच तपासल्या होत्या, असे सांगून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनीही या प्रकरणी महसूल खात्याकडे बोट दाखवत मी नाही त्यातला असे दाखवून दिले आहे.
 
आदर्श घोटाळा प्रकरणी विलासराव देशमुखांनी आज न्यायालयीन चौकशी आयोगासमोर साक्ष दिली. त्यावेळी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगून त्यांनी नाम निराळे राहण्याचा प्रयत्न केला.
राज्याच्या महसूल खात्याकडून तपासून आलेल्या फाईल्समधील प्रत्येक पाने मुख्यमंत्र्यांना पाहणे शक्य नसते, त्यामुळे महसूल मंत्रालयाकडून तपासून आलेल्या फाइल्सवर मी केवळ सही करण्याचे काम केल्याची साक्ष विलासरावांनी आयोगासमोर दिली. त्यावेळी अशोक चव्हाण हे महसूलमंत्री असल्याने विलासरावांनी सर्व खापर त्यांच्यावरच फोडल्याचे स्पष्‍ट झाले आहे.
तसेच मु्‍ख्य सचिवांकडून आपल्याला योग्य ती माहिती मिळाली नसल्याचाही आरोप करत विलासराव मुख्य सचिवही या प्रकरणात दोषी असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
आदर्शची फाईल तपासण्याचे काम महसूल विभाग करत होते. त्यामुळे इमारतीला जागा देण्याचा निर्णय हा सर्वस्वी महसूल विभागाचा होता. त्यामुळे याप्रकरणात आपली कोणतीही भूमिका नव्हती, असे विलासरावांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
 
विलासरावांना पुन्हा बुधवारी म्हणजे उद्या चौकशी आयोगासमोर साक्ष द्यावी लागणार आहे. त्यानंतर येत्या ३० जूनला अशोक चव्हाणांची साक्ष होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदें यांनी देखील सोमवारी साक्ष देताना विलासराव देशमुख यांच्याकडे बोट दाखवून मोकळे झाले होते.

First Published: Tuesday, June 26, 2012, 19:02


comments powered by Disqus